आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर | पुढारी

आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या रखडलेल्या सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पाणीपुरवठा विभाग व प्रादेशिक पाणीपुरवठा विभागास या योजनांची महिनाभरात निविदा प्रकिया राबवून कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची वीजबिलातून मुक्तता होणार असल्याचे दिसत आहे.

सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याचा ठोस निर्णय होऊ शकत नसल्याने या योजनांची वीजबिलातून सुटका होते की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार कोकाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन याबाबत ठोस मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद, प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग, मेडा व महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या बैठक दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार कोकाटे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात मेडाने अंदाजपत्रके व प्रकल्प अहवाल यासाठी तांत्रिक मदत करायची व प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असून ही सर्व प्रक्रिया महिनाभरात राबवायची आहे. आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यात जलजीवन मिशन व पाणीपुरवठा विभाग यांच्यामार्फत अनेक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या. या योजना सुरू झाल्यानंतर त्या पुढे वीजबिल व देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडतात. परिणामी योजना आणि पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतो आणि योजना कुचकामी ठरतात. त्यामुळे या नवीन योजनांच्या अंदाजपत्रकात आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकार्‍यांनी सौर ऊर्जा संयंत्रणेच्या कामाची तरतूद केली होती. या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर सौर ऊर्जा संयंत्रणेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यावरून मेडा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यात एकमत होत नसल्याने याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. ती आता दूर झाली असून योजनांच्या वीजबिलांचा प्रश्न निकाली निघणार आहे.

पाच योजनांना होणार फायदा…
तालुक्यातील निमगाव-सिन्नर किंवा शहा येथे सौर प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यातून मनेगावसह 22 गावे, बारागाव पिंप्रीसह 6 गावे, माळेगाव मापारवाडी, निर्‍हाळे – फत्तेपूर त्याचप्रमाणे शहा व 5 गावे पाणीपुरवठा योजनांना लागणारी वीज तयार होईल. वडांगळीसह 13 गावे व वावीसह 11 गावांनाही सौर ऊर्जा संयंत्रणा मंजूरीची मागणी आ. कोकाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली असून रेट्रॅफिटिंगमध्ये
या कामांची तरतूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button