नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी | पुढारी

नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचे पडसाद मंगळवारी (दि.15) राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात उमटल्याचे बघावयास मिळाले. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच आदिवासी विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी जोरदार घोषणाबाजी केली. ’आदिवासी पीएच.डी. संशोधकांना कधी न्याय मिळेल?’ अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झळकवत जाब विचारला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी) आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा मानव विकास संस्था (सारथी) यांच्यामार्फत ज्या त्या जाती समूहातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. त्याच धर्तीवर अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत फेलोशिप देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सायसिंग पाडवी, रामदास वागदकर, बालाजी डवरे, दामू वसावे, आकाश ढोले या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी एकाला व्यासपीठावर पाचारण केले. पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित विद्यार्थ्यासोबत सविस्तर चर्चा केली. भाषण संपल्यानंतर ना. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

पोलिसांची समज
घोषणाबाजी करणार्‍यांपैकी एकाला पोलिसांनी फौजफाट्यात व्यासपीठावर नेले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना व्यासपीठामागे पोलिस नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री व राज्यपाल कार्यक्रमस्थळांवर मार्गस्थ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.

हेही वाचा :

Back to top button