शिंदे गटाला दोन राज्यपालपदे; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदेही, मुख्यमंत्र्यांची मागणी अमित शहांकडून मान्य

Mahaparinirvan Din
Mahaparinirvan Din

मुंबई; नरेश कदम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला भाजपने दोन राज्यपालपदे आणि केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या पदांसाठी शिंदे गटात मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपचे १०६ आमदार असतानाही मुख्यमंत्रिपद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना दिले. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील ५० टक्के मंत्रिपदे द्या, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. तीही मान्य करण्यात आली. आता दोन राज्यांचे राज्यपालपद आणि केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. ती मागणीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य केली आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाला झुकते माप देत आहे.

गुजरातच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शिंदे गटाच्या खासदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल. यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची नावे आघाडीवर आहेत. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील खासदारही मंत्रिमंडळात वर्णीसाठी शिंदे यांच्याकडे आग्रह धरत आहेत. दुसरीकडे दोन राज्यपालपदेही शिंदे गटाला मिळणार आहेत. यासाठी सुरुवातीला रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नावे चर्चेत होती. परंतु रामदास कदम यांनी राज्यपालपद घेण्यास नकार दिला आहे. मात्र रामदास कदम यांनी आपले चिरंजीव खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करावा, असा आग्रह शिंदे गटाच्या आमदारांनी धरला आहे. तसेच महामंडळावरील नियुक्त्या तातडीने कराव्यात, असा दबाव पदाधिकाऱ्यांकडून येत आहे.

गजानन कीर्तिकर यांचे नाव चर्चेत

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. २०२४ पर्यंत ते खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल, असे शिंदे गटाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news