पुणे : अतिक्रमणांवर हातोडा! लष्कर परिसरातील रस्ते, पदपथांवरील वीस स्टॉल्स हटवले | पुढारी

पुणे : अतिक्रमणांवर हातोडा! लष्कर परिसरातील रस्ते, पदपथांवरील वीस स्टॉल्स हटवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. संपूर्ण लष्कर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. कोणाचेही अतिक्रमण ठेवले जाणार नाही, असा इशारा कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी दिला. मध्यवर्ती भागातील जान मोहम्मद स्ट्रीट, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, महात्मा गांधी रस्ता, ताबूत स्ट्रीट, सेंटर स्ट्रीट, फॅशन स्ट्रीट परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

रस्ते, पदपथांवर बेकायदा उभारलेले वीस स्टॉल्स जागेवर तोडण्यात आले. पथारी व्यावसायिकांनी कपडे टांगण्यासाठी लावलेले स्टँड, दुकानासमोरचे लोखंडी रॅक, हातगाड्या असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत पथारी व्यावसायिकांचा मालही जप्त करण्यात आला आहे. अतिक्रमणांवरील कारवाईचा बडगा सुरूच राहणार आहे, अशी माहिती बोर्डाच्या आरोग्य विभागाचे अधीक्षक आर. टी. शेख यांनी दिली.

लष्कर भागातील सर्वच रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. बेकायदा पथारी व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्ते व पदपथ ताब्यातच घेतले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, पादचार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे, याबाबतच्या तक्रारी वाढल्यावर बोर्डाने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा पथारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. बोर्डाने अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी होत आहे.

अनेक अतिक्रमणधारकांनी आम्ही 10 ते 15 वर्षांपासून व्यवसाय करीत आहोत, यावरच आमची उपजीविका चालते, कारवाई करून नका, अशी विनंती केली. मात्र, एकाचे अतिक्रमण ठेवून दुसर्‍याचे काढू शकत नाही, सर्व अतिक्रमण करणारे एक समान आहेत, त्यामुळे कारवाई केली जाईल, अशी भूमिका अधिकार्‍यांनी घेतली.

एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप काहींनी करीत सुब्रत पाल यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. मात्र अतिक्रमण काढताना भेदभाव केला जात नाही, भविष्यातही होणार नाही. आज कोणावर कारवाई झाली नाही, असे समजू नका. येणार्‍या काळात अतिक्रमणमुक्त मोहीम तीव्र केली जाईल, असा इशारा पाल यांनी दिला.

माजी माननियांचे अभय…?
एका बाजूने कारवाई सुरू झाली की, दुसर्‍या बाजूने फेरीवाले गल्ली-बोळाने पळून जातात. त्यांना बोर्डाच्या काही कर्मचार्‍यांचेच फोन जातात, त्यामुळे कारवाई करण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली, त्यानुसार कारवाई केली जात आहे. अतिक्रमण काढण्यास माजी माननियांचा विरोध असल्याची चर्चा सुरू आहे.

Back to top button