पुणे : कॅफेच्या दुनियेत ‘ती’ चाही बोलबाला; सुमारे 30 टक्के महिला-युवती रेस्टॉरंट-कॅफे व्यवसायाकडे | पुढारी

पुणे : कॅफेच्या दुनियेत 'ती' चाही बोलबाला; सुमारे 30 टक्के महिला-युवती रेस्टॉरंट-कॅफे व्यवसायाकडे

सुवर्णा चव्हाण

पुणे : सध्या कित्येक महिला-युवतींनी रेस्टॉरंट आणि कॅफे व्यवसायात पाऊल टाकले असून, 25 ते 50 वयोगटातील महिला-युवतींनी या क्षेत्रात स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. स्वबळावर त्या रेस्टॉरंट-कॅफे चालवीत असून, या व्यवसायात सुमारे 30 टक्के महिला-युवतींनी पाऊल ठेवले आहे. इंडियन असो वा इटालियन फूड रेस्टॉरंट… कॅफेतील मॅगी असो वा पास्ता… मटण बिर्याणी असो वा चिकन हंडी… पिठलं-भाकरी असो वा वांग्याचे भरीत… अशा लज्जतदार खाद्यपदार्थांमध्ये स्वत:च्या रेसिपीचा तडका देत सर्वजणी या व्यवसायात झेप घेत आहेत.

रेस्टॉरंट किंवा कॅफे व्यवसायावर पुरुषांची मक्तेदारी आहे, हा विचार आता मागे पडला असून, कित्येक महिला-युवतींनी भारतीय खाद्यपदार्थांसह पाश्चिमात्य खाद्यपदार्थांवर आधारित रेस्टॉरंट सुरू केले असून, इटालियन, चायनीज, जपानी आणि मॅक्सिकन पदार्थांचे रेस्टॉरंट उघडले आहेत. काहींनी कॅफे सुरू केले आहेत. त्यात कॉफीपासून ते पास्तापर्यंतचे पदार्थ मिळत आहेत.

काहींनी महाराष्ट्रीय, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, बंगाली खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट सुरू केले असून, पाककृती तयार करण्याची आवड असणार्‍या महिला-युवती या व्यवसायात आहेत. पल्लवी पायगुडे म्हणाल्या, मी एक फूड काउंटर चालविते. पाककृती तयार करण्याची आवड असणार्‍या महिला-युवती या व्यवसायात असून, आता महिला-युवतींनाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एक रेस्टॉरंट चालविणार्‍या समीरा जंगीरा म्हणाल्या, रेस्टॉरंट चालविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत व्यवसाय करावा लागतो, हेच करताकरता मी हा व्यवसाय करीत आले आहे.

अनेकींनी पुण्यात रेस्टॉरंट आणि कॅफे सुरू केले आहेत. यात 20 ते 40 वयोगटातील महिला-युवतींचे प्रमाण जास्त आहे. आपल्या खाद्यपदार्थांमधील वेगळेपणा, त्याची चव आणि त्याच्या मांडणीमुळे त्यांच्या रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये खवय्यांची गर्दी होत आहे. महिला-युवती स्वबळावर रेस्टॉरंट आणि कॅफे चालवीत असून, त्यांच्या खाद्यपदार्थांसह रेस्टॉरंट आणि कॅफेमधील वातावरण अनेकांना भावतेय. रेस्टॉरंट आणि कॅफेमधील पदार्थांच्या चवीकडे लक्ष देण्यापासून ते आर्थिक व्यवहारापर्यंतची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.

                              – किशोर सरपोतदार, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट्स असोसिएशन

ऑनलाइन प्रसिद्धीकडे कल…
सध्या महिला-युवतींकडून रेस्टॉरंट आणि कॅफेविषयी आणि त्यात मिळणार्‍या खाद्यपदार्थांविषयी ऑनलाइन प्रसिद्धी केली जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्या प्रसिद्धी करीत असून, या जाहिराती किंवा संदेश पाहून त्यांच्या रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये येणार्‍या खवय्यांची संख्याही वाढते आहे. व्हिडीओ, छायाचित्रे आणि खास संदेश, यातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. काहींनी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे.

Back to top button