जळगाव जिल्हा दूधसंघ अपहारप्रकरण; कार्यकारी संचालकासह चौघांना अटक | पुढारी

जळगाव जिल्हा दूधसंघ अपहारप्रकरण; कार्यकारी संचालकासह चौघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या काही दिवसापासून पोलीस तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईत दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा दुध संघात मध्यंतरी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. यात मुख्य प्रशासकपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य 10 प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर विद्यमान संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. दरम्यानच्या कालखंडात प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध संघात अपहार झाल्याचे शोधून काढले होते.

दीड कोटीच्या मालाचा अपहार...

प्रशासक मंडळाने दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दूध संघ प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. तर संचालक मंडळाने हा अपहार नसून चोरी असल्याचा युक्तीवाद करून दुसरी तक्रार नोंदविली होती. यासाठी आमदार एकनाथ खडसे यांनी शहर पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलनही केले होते.

यांना ताब्यात घेतले…

तर गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील (६७), किशोर काशिनाथ पाटील (५७) आणि अनिल हरीशंकर अग्रवाल (५९) यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनाही अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.

राजकीय दबावापोटी कारवाई…

पोलिसांनी चौकशी चोरीची करावी, दस्तावेज तपासणीचे काम सहकार विभाग करेल ते तपासणीचे अधिकार पोलिसांना कोणी दिले असा सवाल उपस्थित करत, पोलीस राजकीय दबावापोटी पोलीस दूध संघाचा तपास करत असल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला होता.

हेही वाचा:

Back to top button