विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर | पुढारी

विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादीचे माजी मंत्री, विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांच्यावर विनयभंगासह ७२ तासांत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर आव्हाड कोंडीत सापडले आहेत. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज ( दि. १५ ) दुपारी २ वाजता ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी काही अटी शर्तीसह आव्हाडांना १५ हजार रुपयांच्‍या जातमुचलक्‍यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.  या संपूर्ण निकालाची सुनावणी न्यायाधीश प्रणय गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. यावेळी आव्हाडांचे वकील विशाल भानुशाली आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला.

मंगळवारी  सुनावणीवेळी आपली बाजू मांडताना आव्हाड यांच्या वकिलांनी राजकीय वादातून मुद्दामहून खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्या महिलेला मी तीन वर्षांपासून ओळखत असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या छट पूजेला एक जाहीर कार्यक्रमात त्या माझ्या बहीण असल्याचे सांगितले होते. माझ्या बहिणीसोबत मी असे का करेन असा प्रतिवाद करण्यात आला आहे. आव्हाडांच्या वकिलांनी गर्दीचा व्हिडिओही दाखवला. गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो, असा युक्तिवाद आव्हाडांच्या वकिलांनी केला. आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय हेतून प्रेरित आहे, असाही दावा त्यांनी केला.

आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ठाण्यात सोमवारी दिवसभर जाळपोळ, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. आम्ही अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढत असल्याने माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, त्यास मी घाबरत नाही; पण विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. म्हणूनच अशा घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे सांगत आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी तातडीने ठाण्यात दाखल होत महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का देणारे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे सांगितले होते.

आव्हाड यांनी कोणताही विनयभंग केला नसून, त्यांच्याविरोधात संपूर्ण षड्यंत्र रचून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस अधिकारी यांच्यासमोर घडलेला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी बोलणार असून, खरा सूत्रधार शोधा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

नेमके काय घडले?

रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे कळवा येथील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बाहेर पडत असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असताना, आव्हाडांनी आपला विनयभंग केला, अशी तक्रार भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला.

 

Back to top button