बाली (इंडोनेशिया) : G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (दि.१५) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. जी २० परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सुनक यांची भेट घेतल्याची माहिती पीएमओ कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. ऋषी सुनक यांनीही मोदींच्या भेटीचा फोटो त्यांच्या अकाउंटवर शेअर केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये समोरासमोर झालेली ही पहिलीच भेट आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदी आणि सुनक यांचे फोनवर बोलले झाले होते. उभय नेत्यांनी द्विपक्षीय संतुलित आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार लवकर करण्यावर जोर दिला होता.
पंतप्रधान मोदी सोमवारी बाली येथे पोहोचले. त्यांनी सेनेगल प्रजासत्ताकचे अध्यक्ष मॅकी सॅल, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या बायडेन यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांचीही भेट झाली. बाली येथील अपूर्वा केम्पिंस्की हॉटेलमध्ये ही परिषद होत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत या परिषदेसाठी उपस्थित राहिले आहेत.
मंगळवारी सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी परिषदेतील (G20 Summit) अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सत्रात संबोधित केले. "आम्हाला युद्धविरामाच्या मार्गावर जाण्याचा मार्ग शोधावा लागेल" असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे जगभरातील अन्न पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे जगभरात हाहाकार उडाला असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रही अपयशी ठरले. आता सर्वांनी मिळून युक्रेन युद्ध रोखण्यासाठी मार्ग काढायला हवा, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
याआधी काल सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची बाली येथे G20 शिखर परिषदेपूर्वी भेट झाली होती. बायडेन आणि शी जिनपिंग यांनी सोमवारी बाली येथील हॉटेलमधील भेटीदरम्यान एकमेकांना हस्तांदोलन केले. बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिली वैयक्तिक भेट होती.
हे ही वाचा :