मविप्रचे सभापती क्षीरसागर : खेळामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी | पुढारी

मविप्रचे सभापती क्षीरसागर : खेळामध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थी जीवनामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच पुस्तकी ज्ञान अर्जित करत असताना खेळामध्येही करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. ज्ञानार्जनाबरोबरच तरुणपणात खेळांकडे लक्ष देऊन यशस्वी जीवन जगता येते आणि त्यामुळेच विद्यार्थी दशेतील जीवनामध्ये खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

सिन्नर महाविद्यालय येथे रनिंग, जम्पिंग, थ्रोविंग, मॅरेथॉन, चालणे, अडथळा शर्यत, रिले अशा एकूण 22 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख उद्घाटक संस्थेचे उपसभापती देवराम मोगल, प्रमुख अतिथी चिटणीस दिलीप दळवी, संचालक कृष्णाजी भगत, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, प्रा. एस. डी. इंगळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 71 महाविद्यालयांचे 205 मुली व 400 मुले यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेला जिल्हाभरातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सिन्नर महाविद्यालयाचे उपसभापती मोगल अभिनंदन केले. विस्तीर्ण क्रीडा मैदान, त्याचा विद्यार्थ्यांना होणारा लाभ यामुळे या महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे संस्थेचे चिटणीस दळवी म्हणाले. सिन्नर महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत भरीव योगदान राहिले आहे असेही संस्थेचे संचालक भगत यांनी सांगितले. क्रीडा संचालक प्रा. एस. डी. इंगळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि जिमखाना विभागांतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

महाविद्यालयात अद्ययावत क्रीडांगणे : रसाळ
लाखो रुपये खर्चून आतापर्यंत महाविद्यालयामध्ये अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त क्रीडांगणे तयार केली आहेत. आजही 400 मीटरच्या धावपट्टीचे काम प्रगतीपथावर आहे. यापुढेही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी मैदाने तयार करण्यास प्राधान्य राहील, असे प्राचार्य डॉ. रसाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.

हेही वाचा:

Back to top button