विटा ; पुढारी वृत्तसेवा : विट्यात कापड दुकानात काम करणाऱ्या कामगारावर एकाने कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. आकाश संजय माळी (वय २४, रा. बापट रुग्णालयाच्यामागे, विटा) असे जखमीचे नाव असून, त्याच्यावर रोहित युवराज भिंगारदेवे (रा. फुलेनगर, विटा) याने हा हल्ला केला. विशेष म्हणजे हल्लेखोर रोहित भिंगार देवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यास १३ नोव्हेंबर रोजी तीन महिन्यांसाठी तीन जिल्ह्यातून विटा पोलिसांनी हद्दपार केले होते. या घटनेमुळे विटा पोलीसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबद्दल मिळालेली माहिती अशी की, विटा येथील एका कापड दुकानात आकाश माळी हा काम करतो. काल (रविवार) सकाळी ११ वाजता आकाश दुकानात असताना रोहित भिंगार देवे हा हातात कोयता घेऊन दुकानदारावर दहशत निर्माण करीत होता. त्यावेळी माळी आणि रोहित यांच्यात किरकोळ वाद झाला. या भांडणाचा राग मनात धरून रोहितने सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा कापड दुकानासमोर येऊन तेथे उभ्या असलेल्या आकाशला शिवीगाळ करून कोयत्याच्या पाठीमागील बाजूने त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी आकाशच्या डाव्या हाताला मार लागल्याने तो जखमी झाला आहे.
हल्लेखोर रोहितच्यावर जबरी चोरी, मारामारी, घरफोडी आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला या प्रकरणांमुळे अटकही झाली होती. शिवाय जामिनावर सुटून आल्यानंतरही तो गुन्हे आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचेल असे कृत्य करीत होता. त्यामुळे विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याला १३ ऑक्टोबर रोजी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. तरीही त्याने आता विटा शहरात येऊन दहशत माजवून तरुणावर हल्ला केला. त्यामुळे विटा शहर आणि परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर रात्री उशिरा रोहित भिंगारदेवे याच्यावर विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला.
हेही वाचा :