सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक, मतमोजणीला सुरूवात; धनंजय महाडिक, राजन पाटील, प्रशांत परिचारक यांची प्रतिष्ठा पणाला

सोलापूर पुढारी वृत्तसेवा : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) सोलापुरातील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यावर सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकुण 28 टेबलवर ही मोजणी होणार असून, दोन फेर्यात निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे आज दुपारी चार वाजेपर्यंत भिमा सहकारी साखर कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कारखान्याचे विद्यमान चेअरमन खा. धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास पॅनल आणि माजी आ राजन पाटील आणि माजी आ प्रशांत परिचारक यांच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने रविवारी 78.86 टक्के मतदान झाले होते. कारखान्याच्या 15 जागेसाठी एकुण 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कारखान्याच्या जवळपास 19 हजार 430 मतदारांपैकी जवळपास 15 हजार 323 शेतकरी सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
सध्या तरी सत्ताधारी महाडिक गटाला सत्ता आपलीच येणार असा आत्मविश्वास असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तर मोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा :