नंदुरबार : पिंजऱ्यात येईना कॅमेऱ्यातही दिसेना; तरी सिंह दिसल्याचा दावा सुरुच | पुढारी

नंदुरबार : पिंजऱ्यात येईना कॅमेऱ्यातही दिसेना; तरी सिंह दिसल्याचा दावा सुरुच

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नितीनकुमार वाणी यांच्या मालकीच्या शेतात सिंह पाहिल्याचा दावा त्या शेतातील रखवालदार रोहिदास पाडवी यांनी केल्याने तळोदा तालुक्यातील सिंहाच्या कथित वास्तव्याची आठवडाभरापासून चालू असलेली चर्चा पुन्हा तापली आहे.

हा कथित सिंह सदृश वन्यप्राणी कॅमेरात टिपता यावा म्हणून तळोदा वनविभागाने तीन गावांच्या वन शिवारात चक्क 9 कॅमेरे लावले असून पिंजरा देखील ठेवला आहे. ज्या ज्या शेतांमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला त्या-त्या शेतातील पावलांचे ठसे अभ्यासण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु अद्याप काहीही ठोस हाती आलेले नाही, पण सिंह दिसल्याचा दावा चालूच आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काल पुन्हा पाहणी केली असता आमलाड शिवारात मोठे ठसे आढळून आले. ते ठसे १२ से.मी. लांबी रुंदीचे आहेत. शेतातील रखवालदार रोहिदास पाडवींचे म्हणणे आहे की, रात्री दिसलेला प्राणी हा नर सिंह होता. त्याला मोठी आयाळ होती. गोठ्यात म्हशी व गायी बांधलेल्या होत्या. त्याला पाहताच त्या पाय झटकू लागल्याने मोठा आवाज झाला व सिंहाने पळ काढला; असे पाडवी यांचे म्हणणे आहे.

तळोदा वनविभागाच्या अधिकार्‍यांचे यावर म्हणणे आहे की, सातपुडा जंगलाचा इतिहास पाहता आजपर्यंत या भागात सिंहाने कधीही इकडे अधिवास बनवला नाही किंवा त्यांचे अस्तित्वही कधीच दिसलेले नाही.

पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचेच ते ठसे असावेत

सिंहांचा अधिवास असलेले गिर जंगल येथून 1200 किमी अंतरावर असल्याने त्या भागातून सिंह येण्याचीसुध्दा शक्यता नाही. तथापि आठवडाभरात आठ वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सिंह पाहिल्याचा दावा केल्यामुळे आम्ही सर्व दक्षता घेत आहोत. अद्याप कुठेही सिंह किंवा सिंह सदृश प्राण्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळालेले नाहीत. नंदुरबार येथील आरएफओ मनोज रघुवंशी यांनी सांगितले की, त्या भागात मात्र बिबट्याचा मुक्त संचार चालू असतो. लोकांना त्याचे नित्य दर्शन घडत असते. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचेच ते ठसे असावेत; असा आमचा कयास आहे.

दरम्यान, सिंह सदृश वन्यजीवाबाबत गूढ अधिक वाढत असल्याने आता कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तीन गावांच्या वनशिवारात नऊ कँमेरे लावण्यात आले. नऊ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वन्यजीवाला टिपण्याचा प्रयत्न होत आहे.

वनक्षेत्रपाल एन. जी. रोडे, वनपाल तपासनीस पथकाचे आर. एस. वसावे, वनरक्षक किरसिंग पावरा, राजा पावरा, गिरधर पावरा, श्रावण कुमार, ज्योती खोपे, लक्ष्मी पावरा, दीपक बाळदे यांनी काल हे कॅमेरे लावले. वन्यजीव अभ्यासक सागर निकुंभ, कुणाल भावसार, आशिष बारी, गणेश पाटील, विराज भदाणे, प्रतीक कदम, वैभव राजपूत, यश वळवी, बारी, महेश तावडे हे वन्यजीव प्रेमी दाखल झाले असून त्यांनी वन विभागाला ट्रॅप कॅमेरे लावण्यास सहकार्य केले.

हे ही वाचलं का?

Back to top button