नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम | पुढारी

नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरपट्टी वसुलीमुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी अधिकार्‍यांना डिसेंबरअखेरचा अल्टिमेटमच दिला आहे. पुढच्या 48 दिवसांत 50 कोटी वसूल करा अन्यथा खातेनिहाय कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची तंबीच अधिकार्‍यांना दिली आहे. विशेष बाब म्हणजे डिसेंबरपर्यंत वसुली झाल्यास सत्कार केला जाईल अन्यथा खातेनिहास वसुलीचे पत्र मिळेल, अशा शब्दांत अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले असून, पुढच्या काळात वसुली मोहीम आणखी जोरात राबविली जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांत वसुली झाली नसल्याने त्याचा मोठा ताण महापालिका तिजोरीवर पडला आहे. महसूल घटल्याने वसुलीला सध्या अधिक प्राधान्य दिले जात आहे. कोरोनामुळे थकबाकी पावणेतीनशे कोटींच्या घरात गेली आहे. त्यात बड्या शासकीय संस्थांकडून शंभर कोटींच्या आसपास थकबाकी आहे. या सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी ऑक्टोबरपासून वसुलीची मोहीम तीव्र केली आहे.

पहिल्या टप्प्यात एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1258 थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करत या थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, कालांतराने या मोहिमेला प्रतिसाद मिळत नसून ही बाब लक्षात घेत आयुक्तांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत कर विभागाच्या अधिकार्‍यांबरोबरच विभागीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यांना डिसेंबरपर्यंत 100 टक्के वसुली करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा अल्टिमेटम दिला.

पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष
सध्या महापालिकेकडून घरपट्टी वसुलीवर सर्वाधिक जोर दिला जात आहे. मात्र, यामुळे पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने तिजोरीवरील ताण कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाणीपट्टीतून 85 कोटींची वसुली अपेक्षित असून, आतापर्यंत 38 कोटीच वसूल झाले आहेत. त्यामुळे पाणीपट्टीबरोबर घरपट्टी वसुलीचाही वेग वाढविला जाण्याची शक्यता आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणखी मोठी समस्या ठरताना दिसत आहे.

सेवानिवृत्ती अन् तंबी
एकीकडे आयुक्तांनी वसुलीबाबतची तंबी दिली असताना दुसरीकडे सहापैकी तीन विभागीय अधिकारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. डिसेंबरपर्यंत शंभर टक्के वसुली करून सत्कार स्वीकारण्याची संधी या अधिकार्‍यांना असली तरी, वसुलीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

डिसेंबरपर्यंत शंभर टक्के घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, जे अधिकारी त्यात कसूर करतील त्यांच्यावर खातेनिहाय कारवाई केली जाईल. जे यशस्वी वसुली करतील त्यांचा मात्र सत्कार-सन्मान केला जाईल.
– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,
आयुक्त, महापालिका

हेही वाचा :

Back to top button