पुणे : महामंडळामुळे पन्नास हजार तरुण उद्योजक : नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : महामंडळामुळे पन्नास हजार तरुण उद्योजक : नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रचनेत बदल करण्यात आला. व्यवसायासाठी कर्ज बँकेतून घ्यावे, त्याच्या व्याजाचा परतावा महामंडळ करेल, अशी रचना करण्यात आली. महामंडळाच्या मदतीने राज्यामध्ये पन्नास हजार मराठा तरुण उद्योजक झाल्याचे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा झाला. त्यावेळी पाटील बोलत होते. महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस नामदेव मानकर, पुणे शहराध्यक्ष गुलाब गायकवाड, युवक अध्यक्ष युवराज दिसले, महिला शहराध्यक्ष श्रुतिका पाडाळे, शहर सरचिटणीस गणेश मापारी, दत्तात्रय भिसे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 2014 पर्यंत महामंडळाकडे दुर्लक्ष झालेे. मराठा क्रांती मोर्चामध्ये महामंडळासाठी भरीव निधीची मागणी केली होती. महामंडळाची कर्जपरतफेड होत नव्हती, त्यामुळे योजनेत बदल करण्यात आले. व्यवसाय कुठलाही करा, आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना महामंडळाकडून कर्ज मिळेल. ग्रामीण भागात शेतकर्यांची कर्ज माफी होते, त्यामुळे अनेकदा सीबिल चांगले राहत नाही.

छोटेसे वैयक्तिक कर्ज घेऊन वेळेवर परफेड करा, तुमचे सीबिल चांगले होईल. त्यानंतर तुम्हाला बँका कर्ज देतील. महामंडळाची योजना आता ऑनलाइन आहे. सर्वांची वेळेत कामे होण्यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहे. 98 टक्के लोक कर्जपरतफेड करत आहेत, मात्र कोरोना काळात अनेकांना अडचणी आल्या. त्यांनाही पुन्हा एकदा प्रवाहात आणत आहोत.

Back to top button