ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल | पुढारी

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, आणखी एक गुन्हा दाखल

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चित्रपट वादानंतर आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मुंब्रात राहणाऱ्या एका (40 वर्षीय) महिलेने आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते (रविवार) ठाण्यात दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रथम कळवा पूल व त्यानंतर मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एक महिला भाजप कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि सदर महिला कार्यकर्ता हे आमने-सामने आले.

यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. या घटनेबाबत संबंधीत महिलेने आरोप केला की, आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो, असे म्हणत ढकलले. त्यामुळे माझ्या मनाला लज्जा उत्पन्न झाली, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button