नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अक्षरश: अश्रू तरळले.

तालुक्यात कडवा धरणामुळे पाण्याची सोय निर्माण झाल्यामुळे उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे बिबट्याला लपण्यास जागा उपलब्ध झाली आहे. गेल्या काही वर्षांत उसामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या आढळून येत आहे. हेच बिबटे भक्ष्याच्या शोधात मनुष्य वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. दर आठवड्याला बिबट्यांकडून एक तरी हल्ला होत आहे. तर काही गावात मनुष्यांवरही हल्ले होऊ लागले आहेत. पूर्वी उन्हाळ्यात होणारे हल्ले आता बारमाही होत आहेत. माळरानावर मोकळ्या चरणार्‍या शेळ्या-मेंढ्या बिबट्याचे आयते सावज ठरत आहेत. रोज शेतातून येणारा बिबट्यांच्या डरकाळीचा आवाज, अधूनमधून होणारे बिबट्याचे दर्शन यामुळे सुरेश जाधव यांनी 65 मेंढ्या, 18 शेळ्या तसेच 20 लहान कोकरे असा सर्व कळप एकाच दिवशी सव्वासहा लाखाला विकून टाकला. सुमारे 50 वर्षे जोपासलेला 100 शेळ्या-मेंढ्यांचा वाडा रिकामा झाल्याने जाधव यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रू वाहत होते. ते यापुढे कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी घरची शेती पाहून दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरी करणार आहेत. त्यांचे मित्र लहू बबन शेटे यांनीही बिबट्याच्या त्रासाला कंटाळून सुमारे 50 वर्षांपासून जोपासलेला 90 मेंढ्या-शेळ्यांचा कळप एकाच दिवसात आठ लाखांना विकला. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पाळीव प्राणी पाळून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु वारंवार बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकर्‍यांचे पशुधन नष्ट होत चालले आहे.

हेही वाचा:

Back to top button