

बीजिंग : कधी कधी आपल्याच शरीरात काही अनाहुत पाहुणे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले असतात व त्याची आपल्यालाच कल्पना असत नाही. असाच प्रकार 95 वर्षे वयाच्या एका चिनी माणसाबाबत घडला आहे. ही व्यक्ती आपल्या उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. तिथे तिच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्या व्यक्तीच्या मानेचा एक्स-रे काढण्यात आला. तेव्हा जे दिसले ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्या व्यक्तीच्या मानेत डॉक्टरांना चक्क 'मृत्य' दिसला. गेल्या 77 वर्षांपासून या व्यक्तीचा मानेत बंदुकीची गोळी अडकली आहे; पण त्या व्यक्तीला याची माहितीच नाही. मेडिकल रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही त्या व्यक्तीचे ऑपरेशन करायला नकार दिला आहे.
चीनमधील 95 वर्षांचे झाओ एक निवृत्त सैनिक आहे. शँनडाँगमधील एका रुग्णालयात ते गेले. तिथे त्यांच्या मानेचा एक्स-रे काढण्यात आला. जो पाहून डॉक्टर हादरले. कारण त्यांच्या मानेत बंदुकीची गोळी अडकली होती. मानेत बंदुकीची बुलेट म्हणजे मृत्यूच म्हणावा लागेल. त्यांनाही त्यांच्या मानेत गोळी अडकल्याचे पहिल्यांदाच समजले.
दुसर्या महायुद्धावेळी त्यांना ही गोळी लागली होती. याला जवळपास 77 वर्षे उलटली आहेत. झाओ यांचे जावई वांग यांनी सांगितलं की, युद्धावेळी त्यांना अनेक वेळा गोळ्या लागल्या होत्या; पण त्यांच्या मानेतही गोळी लागली होती याची त्यांनाच माहिती नव्हती. डॉक्टर म्हणाले, गेल्या 77 वर्षांपासून त्यांच्या मानेत ही गोळी अडकली आहे; पण झाओ यांना यामुळे कधीच समस्या झाली नाही हे चमत्कारिक आहे. पण आता माहिती झाल्यानंतरसुद्धा त्यांच्य मानेतील ही गोळी आपण काढू शकत नाही याचं कारण म्हणजे झाओ यांचं वय. त्यांचं वय खूप आहे आणि जर आता त्यांच्या मानेचं ऑपरेशन करून गोळी काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवाला धोका आहे.