गुजरातपेक्षा मोठे कारखाने महाराष्ट्रात उभारू : 'वेदांता रिसोर्सेस'चे अध्यक्ष अनिल आगरवाल | पुढारी

गुजरातपेक्षा मोठे कारखाने महाराष्ट्रात उभारू : 'वेदांता रिसोर्सेस'चे अध्यक्ष अनिल आगरवाल

मुंबई : वृत्तसंस्था : वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्त प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात आला असला, तरी पुढील काळात आम्ही या उत्पादन प्रक्रियेतील प्रगत कारखाने महाराष्ट्रातही उभारणार आहोत आणि ते गुजरातपेक्षा मोठे असतील, असे आश्वासन ‘वेदांता रिसोर्सेस’चे अध्यक्ष अनिल आगरवाल यांनी दिले.

‘मिट’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना आगरवाल यांनी, ‘कुआ खुलेगा तो पानी सबको मिलेगा, असे विधान केले. आमच्या प्रकल्पाची सुरुवात गुजरातमध्ये होत आहे. मात्र, तेथे प्रकल्प उभारणीमध्ये काही वेगळीच आव्हाने आहेत. सध्या येथे केवळ मूळ कच्चा माल आम्ही तयार करत आहोत; तथापि आम्हाला संपूर्ण परिसंस्था उभारायची आहे. या परिसंस्थेतील पुढील टप्पे इतरत्र उभारण्याचे आमचे नियोजन आहे. आणखी काही प्रगत कारखाने आम्हाला सुरू करावे लागलील. त्यात महाराष्ट्राचा वाटा त्या राज्याला निश्चितच मिळेल. हा वाटा गुजरातपेक्षाही मोठा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेदांता आणि तैवानमधील फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या सेमीकंडक्टरनिर्मितीचा १९.५ अब्ज डॉलरचा एक संयुक्त प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील नेते प्रयत्न करीत असताना, तो गुजरातला नेण्याची घोषणा झाली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. या प्रकल्पामुळे गुजरातमध्ये सुमारे १ लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे या कंपन्यांनी जाहीर केल्याने महाराष्ट्रावर रोजगारनिर्मितीबाबत अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हिंदुस्थान टाईम्स लीडरशिप समीट’ या कार्यक्रमात अनिल आगरवाल यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यात आगरवाल यांनी, महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केले.

 

Back to top button