जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या | पुढारी

जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गावठाण जमाबंदी प्रकल्पातंर्गत सुरु असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांच्या ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवार, दि.11 रोजी दिले.

जिल्ह्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्पाच्या (स्वामित्व योजना /ड्रोन सर्व्हे) जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गणेश मोरे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्र अधिकारी एम. व्ही. खडसे, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक नंदकुमार मोरे, भूमी अभिलेख विभागाचे दिलीप काकड आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, जिल्ह्यातील गावांचे ड्रोन सर्व्हेक्षण गतीने पूर्ण करण्यासाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरातवर सनियंत्रण व अंमलबजावणी करीत समित्या गठित कराव्यात. याकरीता भूमी अभिलेख व जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एकमेकात समन्वय राखावा. गावठाण जमाबंदी प्रकल्प हा पथदर्शी प्रकल्प असल्याने हे काम अचूक होण्यासाठी संबंधितांची कार्यशाळा घेऊन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. या प्रकल्पाची नागरीकांना माहिती होण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया व भूमि अभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्यात धुळे तालुक्यातील 64 गावे, साक्री 114, शिरपूर 94 तर शिंदखेडा 96 असे एकूण 368 गावांचे नकाशे भारतीय सर्व्हेक्षण विभागास उपलब्ध करुन द्यावयाचे आहेत. त्यापैकी 180 गावांचे नकाशे प्राप्त झाले आहेत, तर 57 गावांचे जिओ टँगिग पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक बिलोलीकर यांनी बैठकीत दिली. ड्रोन सर्व्हेच्या कामास ग्रामपंचायत विभागामार्फत सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येत असून तशा सूचना संबंधित गावाच्या ग्रामसेवकांना दिल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी बैठकीत दिली.

हेही वाचा:

Back to top button