देशात २०१७ ते २०२१ या पाच वर्षात ५४७ वाघांचा मृत्यू; ३३ वाघांची शिकार | पुढारी

देशात २०१७ ते २०२१ या पाच वर्षात ५४७ वाघांचा मृत्यू; ३३ वाघांची शिकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात वाघ संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात मोहिमा, उप्रकम,अभियान राबवले जात आहेत. असे असतानाही वाघांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात तब्बल ५४७ वाघांच्या मृत्यू झाला.

विशेष म्हणजे यातील ३९३ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. उर्वरित १५४ प्रकरणांमध्ये वाघांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विषबाधेमुळे २५ वाघांचा मृत्यू झाला. यासोबत फासात अडकल्याने ९, तर ३३ वाघांची शिकार करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. विशेष म्हणजे विजेच्या धक्क्याने २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. वन्यजीवांच्या व्यापारामुळे होणारी वाघांच्या मृत्यूची वास्तविक संख्या ८८ असून गेल्या ५ वर्षात नोंदवण्यात आलेल्या एकूण वाघांच्या मृत्यूच्या घटनांच्या १६% आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे (NTCA) वाघांच्या मृत्यूंची पद्धतशीर आकडेवारीची नोंद २०१२ पासूनच केली जात आहे. २०१२ पूर्वीच्या वाघांच्या मृत्यूच्या तपशिलांचा हवाला देणारा कोणताही अहवाल नेहमीच पडताळणी न करता येणारी तथ्ये, गृहितके आणि सांगीव पुराव्यावर अवलंबून असतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन हा कार्यक्रम २००६ पासून अंमलात असून तो वाघ, सह-भक्षक आणि त्यांच्या शिकार तळांसाठी विज्ञान आधारित देखरेख कार्यक्रम आहे. त्यानुसार भारतीय वाघांच्या वाढीचा वार्षिक दर ६% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा

आ. एकनाथ खडसे : खोके वापरा की पेट्या वापरा, विजय आमचाच होणार  

ठाणे : मॉलमधील मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात 

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, कारागृहातील मुक्काम वाढला!

Back to top button