मोशीत रस्त्यावरील पार्किंगवर कारवाई कधी? | पुढारी

मोशीत रस्त्यावरील पार्किंगवर कारवाई कधी?

मोशी : पुढारी वृत्तसेवा : मोशी येथील मुख्य रस्त्यांच्या कडेला व बर्‍याचदा रस्त्यावरच दुचाकी व मोठी वाहने पार्क केली जातात. पोलिस निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. मोशी येथील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे म्हणजे मोठे दिव्य पार केल्यासारखे वाटते. या वाहतूक कोंडीला जसा अरुंद रस्ता कारणीभूत आहे, तसेच या रस्त्यावरील अवैध पार्किंगदेखील कारणीभूत आहे. मोशी भागात सर्रासपणे वाहने रस्त्यावर पार्क केली जात असून, पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर जाणारी वाहने अडवून कारवाई करताना पोलिस दिसतात; मात्र रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करताना पोलिस दिसत नाहीत, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. मोशीत मुख्य चौक व देहू फाटा चौक या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने पार्क केली जातात, यामुळे चौकात वाहनांची कोंडी होते. यावर कसलीच कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित
होत आहे.

कारवाई करण्यास टाळाटाळ
दुचाकीवर डबल प्रवास केला तरी कारवाई करणारे पोलिस अशा वेळी बघ्याची भूमिका घेतात. रस्त्यावर वाहने त्यांच्या डोळ्यासमोर पार्क केले असताना कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. नक्की पोलिस कोणाच्या दडपशाहीखाली काम करतात, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. पार्क झालेल्या वाहनांवर कारवाई झाल्यास येत्या काळात रस्त्यावर वाहनांना वाहतुकीसाठी मार्ग मोकळा असेल, यामुळे वाहतूक कोंडी थोडी तरी कमी होईल.

Back to top button