नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर | पुढारी

नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार ते रविवारी (दि.19 व 20) नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन वर्षांनंतर पोलिस भरती प्रक्रिया जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह आहे. कागदपत्रांची जमवाजमव, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीची पूर्व कल्पना असावी व त्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे या द़ृष्टीने या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली. शिबिरात पोलिस भरतीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची छाननी कशी होते याची माहिती दिली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किती प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी गुण कसे दिले जातात याचे मार्गदर्शनदेखील केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची उंची, वजन तपासले जाईल. शारीरिक चाचणी शनिवार (दि.19) घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणकोणते शारीरिक व्यायाम केले पाहिजे, आहार काय असला पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन केले जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा, किती गुणांचे प्रश्न असतात. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व कमी वेळेत पेपर कसा सोडवला पाहिजे, या विषयाचे मार्गदर्शन केलेे जाणार आहे.

नोंदणीसाठी ऑनलाइन फॉर्मची सुविधा
हे शिबिर मोफत असून, या शिबिरात भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 16 नोव्हेंबर आहे. यासाठी इच्छुक ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करू शकतात. https://forms.gle/vMdWxPnk4o9f1znc8  या संकेतस्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरू शकतात किंवा अश्वमेध करिअर अकॅडमी, मुरकुटे लेन नंबर 1, पंडित कॉलनी, गंगापूर रोड ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केले.

हेही वाचा:

 

Back to top button