नाशिक : सिमेंट दरवाढीमुळे ‘ड्रीम होम’ महागणार | पुढारी

नाशिक : सिमेंट दरवाढीमुळे ‘ड्रीम होम’ महागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दसरा, दिवाळी अन् पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आपले ड्रीम होम साकारत रिअल इस्टेट क्षेत्राला झळाळी दिली. परंतु, कुठलेही ठोस कारण नसताना अचानकच सिमेंट कंपन्यांनी सिमेंट बॅगमागे 30 ते 50 रुपयांची दरवाढ केल्याने त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे इंधनाच्या किमती स्थिर असताना तसेच रेल्वेकडूनही ट्रान्स्पोर्टचा खर्च वाढविलेला नसताना कंपन्यांनी केलेल्या या दरवाढीबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट क्षेत्राला ‘अच्छे दिन’ चे चित्र आहे. अनेकांकडून आपल्या बजेटप्रमाणे घर खरेदीला प्राधान्य दिले आहे. मात्र, सिमेंट उत्पादक कंपन्यांकडून जणू काही सर्वसामान्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावण्याचे काम केले जात आहे. ट्रान्स्पोर्टचा कोणताही खर्च वाढला नसताना तसेच कच्च्या मालाच्या किमतीही स्थिर असताना कंपन्यांनी अचानकच प्रति सिमेंट बॅगमागे 30 ते 50 रुपयांची भरघोस वाढ केली आहे. सध्या सिमेंट इंडस्ट्रीच्या चाव्या मोजक्याच तीन ते चार कंपन्यांच्या हाती असल्याने त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणूस बेजार झाला असताना, सिमेंट दरवाढीमुळे महागणारे घरे घेणे त्याला परवडणार काय? असा सवाल बांधकाम व्यावसायिकांकडूनच केला जात आहे. बांधकाम क्षेत्रात बर्‍यापैकी तेजीचे वातावरण आहे. अशात सिमेंटची दरवाढ पुन्हा या क्षेत्रात मंदीचे वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. एका संस्थेच्या अहवालानुसार ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक सिमेंट बॅगमागे सरासरी 3 ते 4 टक्के दराची वृद्धी झाली आहे. सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागांत हे दर कमी-अधिक प्रमाणात लागू केले असले तरी, येत्या 22 नोव्हेंबरपासून सर्वच विभागात प्रतिसिमेंट बॅगमागे 30 ते 50 रुपयांची वाढ केली जाणार आहे. अगोदरच यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने त्याचा बांधकामांवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी सणासुदीत ज्या वेगाने गृहविक्री होऊ शकली नाही.

सिमेंट कंपन्यांनी मनमानी पद्धतीने दरवाढ केली आहे. ट्रान्स्पोर्टचा खर्च स्थिर असताना दरवाढीचे काही कारण नव्हते. दरवाढीचा परिणाम घरांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. सिमेंट अधिक किमतीत मिळत असेल, तर दरवाढ क्रमप्राप्त ठरते. – सुनील गवांदे, सचिव, नरेडको

हेही वाचा:

Back to top button