नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी | पुढारी

नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ट्रॅव्हल्स एजंटच्या फसवणुकीमुळे नाशिक येथील मलेशियात पोलिसांच्या ताब्यातील १५ पर्यटक खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी सुखरूप पोहोचले आहेत. मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी खा. गोडसे यांची भेट घेत आभार मानले.

सुभाष ओहोळे, मीनाक्षी ओहोळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, प्रवीण नुमाळे, द्रौपदी जाधव, इंदूबाई रूपवते हे पर्यटक नाशिक येथील असून, त्यांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटमार्फत मलेशिया दौऱ्याची आखणी केली होती. पर्यटकांना घेऊन एजंट नाशिक येथून हैदराबादला गेला होता. तेथून १९ पैकी चार जणांच्या व्हिसाचे काम अपूर्ण आहे. तुम्ही विमानाने पुढे चला मी सायंकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो, असे सांगितले. एजंटने १५ पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसून दिले. एक दिवस उलटून गेला तरी एजंट मलेशियात पोहोचला नाही व त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मलेशिया पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना बंदिस्त केले होते.

पर्यटकांच्या नाशिक येथील नातेवाइकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यावर गोडसे यांनी लगेचच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. या पत्राची दखल घेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मलेशियातील भारतीय दूतावासाला या घटनेची माहिती कळवली. भारतीय दूतावासाने लगेचच संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधत जप्त केलेले पासपोर्ट परत देऊन त्यांना हैदराबादच्या विमानात बसवून मायदेशी पाठविले.

हेही वाचा:

Back to top button