नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा | पुढारी

नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निविदा प्रक्रिया अंतिम होऊनही घंटागाडीचा कार्यादेश लटकवून ठेवल्याने या ठेक्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असून, आता याबाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना निवेदन देत त्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठेक्याबाबत आयुक्तांवर मंत्रालयातून दबाव असल्याचा आरोपही बडगुजर यांनी केला आहे.

सन २०१६ मध्ये महापालिकेने पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका दिला होता. गेल्या ४ डिसेंबर २०२१ ला या ठेक्याची मुदत संपुष्टात आल्याने किमान सहा महिने आधी प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू करणे अभिप्रेत होते. विशेष म्हणजे महासभेने प्रशासकीय मान्यता देवूनही मुदतीत निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याचा आरोप करत विविध कारणे देत एक वर्षापासून घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात असल्याची बाब महानगरप्रमुख बडगुजर यांनी निवेदनाव्दारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. नवीन ठेकेदार नियुक्त होत नसल्याने सध्याच्या घंटागाडी ठेकेदारांकडून अनियमितता होत आहे. दोन ते तीन दिवसानंतर प्रभागांमध्ये घंटागाडी येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. स्थायी समितीने २८ फेब्रुवारीला २०२२ रोजी करार करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार मार्च २०२२ अखेर कार्यारंभ आदेश देणे क्रमप्राप्त असताना अद्यापपर्यंत दिलेला नाही. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लेखा परिक्षणासाठी नस्ती पाठवल्याचे घनकचरा विभागाकडून सांगितले जाते. परंतू, निविदा अंतीम करण्यापुर्वी लेखा परिक्षण होते. त्यानंतर स्थायी समितीवर प्रस्ताव सादर केला जातो. आयुक्तांच्या आग्रहानुसार पुन्हा लेखा परिक्षण करण्यात आले. प्रस्तावात त्रुटी असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे. यात गैर नाही. परंतू, या सर्व प्रकरणात आयुक्तांचीच भुमिका संशयास्पद असल्याचा संशय सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे.

२८ फेब्रुवारीला करार करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच निविदा प्रक्रिया अंतिम झाली आहे. असे असताना ठेका न देता शहराला वेठीस धरण्यामागील कारण काय हे प्रशासनाने स्पष्ट करावे. काहीच भूमिका न घेणे ही बाब संशय निर्माण करणारी आहे. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

नेमकी माशी कुठे शिंकतेय

घंटागाडी निविदा प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे. केवळ कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे. असे असताना ठेका देताना नेमकी माशी कुठे शिंकते आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणामागे मंत्रालयातून प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत असून, निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्यास प्रशासनाने फेरनिविदा प्रक्रिया राबवावी. नाहीतर कार्यारंभ आदेश द्यावा, अशी सूचना बडगुजर यांनी केली आहे. नेमका विलंब का आणि कशासाठी लावला जात आहे आणि त्यामागील अर्थ काय असा जाब बडगुजर यांनी विचारला आहे.

प्रशासनाकडून घंटागाडी ठेका देण्याबाबतची प्रक्रिया नियमानुसार सुरु आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महानगरपालिका.

हेही वाचा:

Back to top button