नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या | पुढारी

नाशिक : दिवाळी सुट्टीनंतर शाळा गजबजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्या तब्बल १८ दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवार (दि.९) पासून शाळा गजबजल्या. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा श्रीगणेशा झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सकाळपासूनच शाळेतील वर्गात वेळेवर हजेरी लावण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची लगबग सुरू होती. लहान मुलांचा अपवाद वगळता प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेला जाण्यासाठी उत्सुक दिसत होता.

शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राचा पहिला दिवस असल्यामुळे शैक्षणिक संस्था व्यवस्थापन शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. शाळा सुरू करण्यापुर्वी वर्गासह परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. काही शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. प्रथम सत्र परीक्षेच्या सुट्टीनंतर आपला मित्र-मैत्रिणींचा गट पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पहिला दिवस असल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांना शाळेला सोडण्यासाठी आले होते. शाळेत गेल्यानंतर विद्यार्थी मित्र कंपनीत रमले. पहिल्या तासाला दिवाळीच्या सुट्टीत शाळेत सांगितलेला अभ्यासाची तपासणी झाली. दरम्यान, मामाच्या गावाहून परत आलेल्या बालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्यासाठी काहीसा कंटाळा केला. त्यामुळे प्ले स्कूल पासून ते चौथीच्या वर्गांपर्यंत संख्या कमी राहिली. पहिल्याच दिवशी काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता. तर काही विद्यार्थी कंटाळवाणे होते. प्ले स्कूलचे विद्यार्थ्यांचा पहिला तास खेळात आणि अभ्यास तपासणीत गेला. काही शाळांत शिस्त आणि सूचनांचे पालन करण्याचा मंत्रही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दिवाळी सुट्टीत केलेल्या धमाल-मज्जाचे कथन करत आठवणींना उजाळा दिला.

थंडीतही विद्यार्थ्यांची हजेरी…

गेल्या काही दिवसांपासून नाशिकात थंडीचा जोर वाढला आहे. अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्यातही थंडीत कुडकुडत विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. सकाळच्या सत्रात बहुतांश विद्यार्थी स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे यासारखे उबदार कपडे घालूनच वावरत होते. दुपारच्या सत्रात उन्हाचा तडका असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित गणवेशालाच प्राधान्य दिले होते. मात्र, शाळा सुटल्यानंतर अर्थात सायंकाळी विद्यार्थ्यांनी ऊबदार कपडे परिधान करूनच घराकडे प्रस्थान केले.

हेही वाचा:

Back to top button