कोंढवा : स्कूल बसचे रस्त्यांवरच पार्किंग | पुढारी

कोंढवा : स्कूल बसचे रस्त्यांवरच पार्किंग

कोंढवा ;पुढारी वृत्तसेवा : नियमांवर बोट ठेवून इंग्रजी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांना फीमध्ये कसलीही सूट न देत नाहीत. मात्र, याच शाळा वाहतुकीचे सर्व नियम गुंडाळून स्कूल बस रस्त्यांच्या बाजूला बिनधास्त पार्क करतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शाळांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कोंढवा, वानवडी, उंड्री परिसरात अनेक नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.

यातील काही शाळांकडे बस पार्किंगची व्यवस्थाच नाही. तर काही शाळांकडे पार्किंग व्यवस्था असताना देखील स्कूल बस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे शाळा भरण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी वाहतूक कोंडी होते. बस रस्त्याच्या पुरशा कडेला न घेता विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जाते किंवा सोडले जाते.

यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा व्यवस्थापन वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांची घुसमट होताना दिसते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेळके म्हणाले, की उंड्री परिसरात एखाद्या शाळेमुळे वाहतूक कोंडी होत असेल, तर नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविणे गरजेचे आहे. संबंधित शाळेवर कारवाई केली जाईल.

कोंढवा, वानवडी, उंड्री परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तींनी समाजाच्या हिताचा विचार करायला हवा. वाहतूक पोलिसांनी अशा गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

                                                  -प्रवीण आबनावे, रहिवासी

Back to top button