नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला | पुढारी

नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्‍हे फाट्यावर बुधवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास दोन गटांत वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार योगेश पाटील यांच्यावर एकाने धारदार कोयत्याने वार केला. ते गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सारंग रंगनाथ माळी (23, रा. माणिकखांब), तुषार प्रकाश भागडे (19, रा. तळेगाव, इगतपुरी), नागेश हरिश्चंद्र भंडारी (चिमण्या) (18 वर्षे 2 महिने, रा. नांदगाव सदो), पुरुषोत्तम संजय गिरी (गंगा) (19, रा. वाडीवर्‍हे) या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री 11 च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी योगेश पाटील आणि त्यांचे सहकारी प्रवीण तातळे इगतपुरीकडून नाशिककडे जात होते. वाडीवर्‍हे येथील कवटी फाटा पोलिस चौकीच्या मागे हॉटेल ब्रह्मगिरीजवळ त्यांना गर्दी दिसली म्हणून ते तिथे गेले. त्यांना त्या ठिकाणी दोन गटांत वाद सुरू असल्याचे दिसले. वाद सोडविण्यासाठी हवालदार योगेश पाटील, निवृत्ती तातडे गेले असता त्यांना संशयित आरोपींनी आमच्या वादात का पडले, या कारणावरून कुरापत काढली.

आरोपी सारंग माळी याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने पोलिस हवालदार पाटील यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. संशयित आरोपी तुषार भागडे याने निवृत्ती तातडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले.
आरोपी नागेश भंडारी, पुरुषोत्तम गिरी यांनी जखमी साक्षीदारांना वाईट साईट शिवीगाळ करून जिवे मारण्याचा दम दिला, अशी फिर्याद स्थानिक गुन्हे पोलिस हवालदार प्रवीण भाऊराव मासुळे (43) यांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक करण्यात आले आहे. वाडीवर्‍हे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयित पकडले
पोलिस कर्मचार्‍यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हल्लेखोर दुचाकीने फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकदेखील तत्काळ हजर झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांची माहिती मिळवत पोलिसांनी समृद्धी महमार्गालगत लपून बसलेल्या संशयितांना ताब्यात घेतले.

हेही वाचा :

Back to top button