नगर : एसटी महामंडळाची दिवाळी 9 कोटींची | पुढारी

नगर : एसटी महामंडळाची दिवाळी 9 कोटींची

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेली प्रवाशांची गर्दी आणि हंगामी भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाला अकरा दिवसांत 8 कोटी 95 लाख 88 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अद्यापि महामंडळाची भाऊबीज जोमात सुरू आहे. सरासरी दहा टक्के भाडेवाढीतून जवळपास 89 लाख रुपयांची भर पडली आहे. दोन वर्षांनंतर दिवाळी सण मोठ्या धुमधामात साजरा झाला. दिवाळीनिमित्त एसटीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. या वाढत्या गर्दीचा महामंडळाला उत्पन्न वाढीसाठी फायदा होतो. त्यानुसार महामंडळाने 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सरासरी 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली.

दिवाळी सणानिमित्त घरी जाण्यासाठी नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक या तीन बसस्थानकांसह तालुक्यांचे व ग्रामीण भागातील बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. फक्त लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता उर्वरित दहा दिवस महामंडळाच्या बस प्रवाशांनी खचाखच भरून धावत होत्या.त्यामुळे महामंडळाच्या नगर विभागाच्या तिजोरीत दररोज सरासरी 81 लाख रुपयांचे उत्पन्न जमा होत होते.

21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांच्या कालावधीत तब्बल 8 कोटी 95 लाख 88 हजार रुपये उत्पन्न नगर विभागाला मिळाले आहे. भाऊबीजनंतर महामंडळाच्या उत्पन्नात अधिकच वाढ होत आहे. महामंडळाची दिवाळी अद्याप जोमात सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून बसगाड्या हाऊसफूल धावत आहेत.

 

तारकपूरबरोबरच कोपरगाव आगारातूनही 1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. चालक, वाहक व यांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आणि प्रवाशांचे सहकार्य यामुळेच नगर विभागाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले.
                                            -मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक, अहमदनगर

आगारनिहाय उत्पन्न
तारकपूर : 1 कोटी 11 लाख 54 हजार
शेवगाव : 70 लाख 86 हजार
जामखेड : 72 लाख 93 हजार
श्रीरामपूर : 89 लाख 11 हजार
कोपरगाव : 1 कोटी 1 लाख 65 हजार
पारनेर : 70 लाख 98 हजार
संगमनेर : 91 लाख 68 हजार
श्रीगोंदा : 78 लाख 78 हजार
नेवासा : 69 लाख 48 हजार
पाथर्डी : 72 लाख 78 हजार
अकोले : 66 लाख 9 हजार

Back to top button