टेरेसवरील हॉटेलवर अखेर हातोडा; विमाननगर-कल्याणीनगरमध्ये कारवाई | पुढारी

टेरेसवरील हॉटेलवर अखेर हातोडा; विमाननगर-कल्याणीनगरमध्ये कारवाई

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: ‘विमाननगर, कल्याणीनगर भागातील टेरेसवरील हॉटेलवर कारवाई कधी करणार?’ या आशयाचे वृत्त पुढारी ऑनलाइन मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने विमाननगर व कल्याणीनगरमधील दोन हॉटेलवर कारवाई केली. दोन्ही हॉटेलचे टेरेसवरील शेड, बांधकाम, मंडप, टेबल, खुर्च्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विमाननगर, कल्याणीनगर भागात टेरेसवर अनधिकृत हॉटेल सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर विमाननगर भागातील 10, तर कल्याणीनगर भागातील 9 हॉटेलला बांधकाम विभागाने नोटिसा दिल्या आहेत. मात्र, या भागातील टेरेसवरील हॉटेलवर कारवाई करण्यात आली नव्हती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनतर विमाननगर भागातील इराणी हॉटेलवर बग अँड बार रूप टॉप हॉटेलचे तीन हजार स्क्वेअर फूट अतिक्रमणांवर कारवाई केली.

तसेच कल्याणीनगरमधील टेरेसवर सुरू असलेले रास्ता हॉटेलचे शेड यासह इतर बांधकाम पाडण्यात आले. शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाने, उपअभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता कश्यप वानखेडे, फारुख पटेल, पराग गोरे, पोलिस निरीक्षक आर. डी. अडागळे, यासह अतिक्रमण विभागाचे पोलिस, बिगारी कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

यापुढेही कारवाई सुरूच राहणार…
विमाननगरला 10, कल्याणीनगरला 9, खराडीमध्ये 7 टेरेसवर अनधिकृत हॉटेल सुरू आहेत. यावर कारवाई कधी करणार, असे अधिकार्‍यांना विचारले असता यापुढे कारवाई सुरूच रहाणार असल्याचे कनिष्ठ अभियंता कश्यप वानखेडे, फारुख पटेल यांनी सांगितले.

Back to top button