जेजुरी : नाझरे धरणातून लवकरच दिवसाआड पाणीपुरवठा | पुढारी

जेजुरी : नाझरे धरणातून लवकरच दिवसाआड पाणीपुरवठा

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: नाझरे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यासाठी नवीन मोटार बसविण्यात येत असून, लवकरच जेजुरी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासोबतच जेजुरी शहराला वीर धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

हा आराखडा डिसेंबर महिन्यात शासनाकडे सादर होऊन एक वर्षाच्या आता पूर्ण क्षमतेने जेजुरी शहराला वीर धरणातून पाणीपुरवठा होणार आहे. जेजुरी शहराच्या विकासासाठी नाट्यगृह, उद्यान, ऐतिहासिक पेशवे व होळकर तलावांचे सुशोभीकरण आदी कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

जेजुरी नगरपालिका सभागृहात आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, अजिंक्य देशमुख, रुक्मिणी जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, सुशील राऊत, बाळासाहेब जगताप तसेच पालिकेच्या अधिकारी नेहा गाजरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत जेजुरी शहराचे प्रश्न, समस्या, उपाययोजना, विकासकामे, नवीन योजनेबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार संजय जगताप म्हणाले की, सन 2017 मध्ये 2 कोटी 65 लक्ष रुपये वीजबिलाची थकबाकी होती. तत्कालीन सरकारकडे दंड, व्याज कमी करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला व उर्वरित वीजबिल भरण्यात आले. मात्र, पुन्हा दंड व व्याज माफ न होता ते थकबाकीत आले. तो प्रश्न सोडविला जाईल. जेजुरी शहर तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने आरोग्य व स्वच्छता यंत्रणेवर भार पडतो.

असे असताना गेली तीन वर्षांपासून यात्रा अनुदान उपलब्ध झाले नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील साडेचार कोटी रुपयांची ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावांचे सुशोभीकरण, रेलिंग आदी विकासकामे लवकरच सुरू होतील.

जेजुरी शहरातील पाणीटंचाईबाबत केलेले नियोजन, वीर धरणावरील नवीन पाणी योजना, शासनाच्या अनुदानातून सुरू असलेली विकासकामे, वाहनकर ठेका, आठवडा बाजार ठेका, आठवडा बाजारातील नवीन ओट्यांचे लिलाव, चतुर्थ करआकारणी, संभाजीराजे व्यापार संकुल, पंतप्रधान आवास योजनेसाठी जागा, शहरातील स्वच्छता, आरोग्यावर उपाययोजना तसेच गावात भटक्या कुत्री व डुकरांचे वाढते प्रमाण, चिंचेच्या बागेतील स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षण अभियान आदी विषयांवर मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी माहिती दिली.

 

 

Back to top button