रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार | पुढारी

रिपाइंचे आंदोलन : भूमिअभिलेख कार्यालयास चपलांचा हार

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

प्रशासकीय कार्यालय सतत बंद असल्याने संतप्त झालेल्या रिपाइं कार्यकर्त्यांनी येथील भूमिअभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयास थेट चपलांचा हार घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

येथील सिटी सर्व्हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने शहराबराबरच ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली असून येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे सामान्य जनता वेठीस धरली जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच येथील अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी रिपाइंचे युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, ॲड. प्रमोद अहिरे यांनी केली.

जमीन, घर, प्लॉटची खरेदी-विक्रीची नोंद, सातबारा उतारा, नकाशे, शेती संबंधित कागदपत्रे या सर्वांचा संबंध भूमिअभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयाशी आहे. शहरापासून गाव- खेड्यापर्यंत सर्वच नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. मनमाडला हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाण मौलाना अबुल कलाम आझाद हॉलमध्ये आहे. मात्र, सदर कार्यालय नेहमीच बंद असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच येथील अधिकारी कायम मोजणीला आहे. मिटिंगला आहे असे सांगून ऑफिस बंद ठेवतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून अनेकांचे काम प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठांनी दखल घेत संबधीत अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या दोघांनी दिला यावेळी रिपाइंचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते

आमदारांनाही करावे लागले होते आंदोलन….

येथील सिटी सर्वे कार्यालय याच कारणामुळे आमदार सुहास कांदे यांना देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले होते. तर काही महिन्यापूर्वीच येथील एका अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. तरी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानीपणा सोडत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button