पुणे : सोन्यासाठी अपहरण करून एकाचा खून | पुढारी

पुणे : सोन्यासाठी अपहरण करून एकाचा खून

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सोन्यासाठी बिबवेवाडीतील वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी खून प्रकरणाचा छडा लावला असून, वास्तूशास्त्र सल्लागाराच्या मित्रासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे. खून करणारा मुख्य सूत्रधार आणि वास्तूशास्त्र सल्लागार हे दोघे एकमेकांचे मित्र होते. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून निरा नदीत टाकून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नीलेश दत्तात्रय वरघडे (वय 43, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. या प्रकरणी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नर्‍हे, आंबेगाव), साथीदार रणजित ज्ञानदेव जगदाळे (वय 29) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी वरघडे यांचा सोन्यासाठी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याबाबत रूपाली वरघडे (वय 40) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मृतदेहासाठी निरा नदीत शोधमोहीम

नीलेश यांना दागिने घालण्याची हौस होती. आरोपींनी नीलेश यांचा मृतदेह निरा नदीत टाकून दिल्याचे तपासात उघडकीस आले असून, मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोटार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाइल असा 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खून झाला त्यावेळी नीलेश यांच्या अंगावर 26 तोळे सोन्याचे दागिने होते.

Back to top button