पिंपरी-पुणे मेट्रोमार्ग पूर्ण, फुगेवाडी ते न्यायालय मार्गाची नोव्हेंबरमध्ये चाचणी | पुढारी

पिंपरी-पुणे मेट्रोमार्ग पूर्ण, फुगेवाडी ते न्यायालय मार्गाची नोव्हेंबरमध्ये चाचणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते रेंजहिल या मेट्रो स्थानकादरम्यानच्या उन्नत मार्गिकेवरील (व्हायाडक्ट) शेवटच्या सेगमेंटची उभारणी सोमवारी झाली. फुगेवाडी स्थानकापासून न्यायालयापर्यंतच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी घेणे शक्य होणार आहे. चाचणीनंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.

महापालिका भवनापासून रेंजहिल स्थानक हा बारा किलोमीटर उन्नत मार्ग असून त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत मार्ग आहे. संरक्षण विभागाकडून हॅरिस पूल ते खडकी दरम्यानची जागा मिळण्यास विलंब झाला. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जुलै 2022 मध्ये जागा मिळाली. दरम्यानच्या काळात महामेट्रोने काम न थांबवता रेंजिहल स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे पूर्णत्वास नेली. खडकीतील जागा मिळाल्यानंतर तेथे व्हायाडक्ट उभारणीला प्राधान्य देण्यात आले. शेवटच्या सेगमेंटची उभारणी आज करण्यात आली, त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका भवनापासून रेंजहिल स्थानकापर्यंतचा व्हायाडक्ट पूर्ण झाला.

या बारा किलोमीटर मार्गावरील व्हायाडक्ट पू़र्ण झाल्याने, पिंपरीपासून न्यायालयापर्यंत मेट्रो चालविण्याची चाचणी 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पिंपरीतून थेट पुण्यात न्यायालयापर्यंत प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. महामेट्रोने नाशिक फाटा येथे उभारलेल्या भव्य कास्टिंग यार्डमध्ये 3934 सेगमेंट बनविण्यात आले. पहिला सेगमेंट 29 ऑगस्ट 2017 रोजी, तर शेवटचा सेगमेंट 19 ऑक्टोबर 2022 रोजी बनविण्यात आला. कोरोना साथीच्या काळात महामेट्रोसह मोठे प्रकल्प बंद पडले होते. खडकीत वाहतुकीचे नियमन हेही आव्हान होते. सैन्यदलाकडील जमीन, कोरोना आणि वाहतूक नियमन आदी अडचणींवर मात करून महामेट्रोने नियोजित वेळेत या 12.064 किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण केले.

पुणे मेट्रोच्या कामाचा आजचा दिवस हा महत्त्वाचा टप्पा आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते रेंजहिल स्थानक या 12.064 किमी उन्नत मार्गाच्या व्हायाडक्टचे काम नियोजित वेळेत पूर्ण होत आहे. लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Back to top button