पिंपरी : कुणी रक्तदान करता का! शहरात जाणवतोय तुटवडा | पुढारी

पिंपरी : कुणी रक्तदान करता का! शहरात जाणवतोय तुटवडा

दीपेश सुराणा
पिंपरी : दिवाळीच्या कालावधीत रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निगेटिव्ह रक्तगटाबरोबरच पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताचादेखील तुटवडा जाणवत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये तर रक्ताच्या मोजक्याच पिशव्या उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना रक्तदात्यांना बोलावून गरजेनुसार रक्ताची गरज भागवावी लागत आहे.

थॅलेसेमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेल अ‍ॅनिमिया आजार झालेल्या रुग्णांना सतत रक्ताची गरज लागत असते. त्यांना काही कालावधीनंतर रक्त बदलावे लागते. सध्या जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे त्यांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांची रक्ताची मागणी लक्षात घेता रक्तपेढ्यांना रक्तदात्यांना बोलावून त्यांना रक्त उपलब्ध करुन द्यावे लागत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

रक्तपेढ्यांतील सद्यःस्थिती
शहरातील काही प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा आणि कोणत्या रक्तगटाच्या रक्ताचा तुटवडा आहे, याबाबत विचारणा केली असता सर्वच रक्तगटाच्यापिशव्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. तुलनेत बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा सर्वाधिक तुटवडा आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये केवळ दोनच दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. तर, काही रक्तपेढ्यांमध्ये मात्र 15 दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

रक्ताची दररोजची गरज किती?
वायसीएम येथील रक्तकेंद्रामध्ये रक्त व रक्तघटक यांच्या एकूण 50 ते 60 रक्त पिशव्यांची दररोजची गरज असते. दिवाळी सणामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असल्याने ही मागणी घटून सध्या 30 ते 40 रक्त पिशव्यांवर आली होती. ही मागणी भागविण्यासाठी रक्तकेंद्रातर्फे रक्तदात्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्यात येत आहे, अशी माहिती वायसीएम रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी शंकर मोसलगी यांनी दिली.

रक्तदान शिबिर घटल्याचा परिणाम
शाळांना लागलेल्या दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक नागरिकांनी गावी आणि पर्यटनासाठी जाण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून रक्तदान शिबिराचे प्रमाण घटले आहे. पर्यायाने, रक्ताची मागणी वाढली असताना त्या प्रमाणात रक्त उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. रक्तपेढ्यांकडे रक्तदात्यांची सूची असते. त्यामुळे आवश्यकतेनुसार रक्तदात्यांना बोलावून ही गरज भागविली जात आहे.

थॅलेसेमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेल अ‍ॅनिमिया आजार झालेल्या रुग्णांना सतत रक्ताची गरज लागत असते. त्यांना काही कालावधीनंतर रक्त बदलावे लागते. रुग्णाच्या परिस्थितीवर या बाबी अवलंबून असतात. सध्या रक्ताचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यायला हवे.
                                                         – डॉ. आरती उदगीरकर, पॅथॉलॉजिस्ट.

वायसीएम रक्तकेंद्रामध्ये सध्या सर्व रक्तगटाच्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांच्या गरजेनुसार रक्तदात्यांना बोलावुन त्यांना आवश्यक रक्त उपलब्ध करुन दिले जात आहे. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तदानासाठी रक्तदात्यांनी पुढे यायला हवे.
                                               – शंकर मोसलगी, रक्तसंक्रमण अधिकारी,

वायसीएम हॉस्पिटल रक्तकेंद्र. सध्या रक्तपेढ्यांमध्ये सर्वच प्रकारच्या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. आमच्याकडे रक्तदात्यांची सूची आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आम्ही रक्तदात्यांना बोलावुन त्यांना रक्त उपलब्ध करुन देत आहोत.

– दीपक पाटील, प्रशासकीय व्यवस्थापक, पिंपरी सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक,

पिंपरी सध्या दररोज 7 ते 8 रक्तपिशव्यांची मागणी आहे. रक्तपेढीमध्ये सध्या 15 दिवस पुरु शकेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. मात्र, बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे.
                                        -नीलेश गायकवाड, संचालक, मोरया रक्तपेढी, चिंचवड.

Back to top button