जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आमदार एकनाथ खडसे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात इन्कमिंग आऊटगोईंगचे सत्र सुरूच आहे. यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मात्र राजकीय उलथापालथ होत आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना व बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता मतदारसंघातील खडसे समर्थक तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी रेंभोटा येथील छोटू पाटील, वाघाडीचे भैय्या पाटील, भूषण पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, नगरसेवक आरीफ आझाद, पियुष मोरे, मुकेश वानखेडे उपस्थित होते.
मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचे जिल्हा सोशल मेडिया सेलप्रमुख माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, निंभोरा स्टेशन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील, निंभोरा स्टेशनचे उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर (धामोडी) यांनी कार्यकर्त्यांसाहित शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षांतरावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना डिवचले. "त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के व आता हे माणसांचे धक्के" अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. लवकरच मुक्ताईनगर येथे संपर्क यात्रा होणार असून, यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.