नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय' शी संबंधित तरतुदी प्रस्तावित दूरसंचार धोरणातून वगळल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन दूरसंचार कायदा तयार करण्याच्या संदर्भात सध्या दूरसंचार धोरण बनविले जात असून या धोरणात 'ट्राय' शी संबंधित काही तरतुदी आल्या आहेत. नवा कायदा आल्यानंतर 'ट्राय' चे महत्व कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ट्राय शी संबंधित तरतुदी आता वगळण्याचा सरकारचा विचार आहे.
एकीकडे 'ट्राय' शी संबंधित तरतुदी वगळतानाच दुसरीकडे दूरसंचार नियामक प्राधिकरणाला मजबुती प्रदान करण्यासाठी वेगळे विधेयक आणण्याची शक्यता सरकार आजमावत आहे. याबाबत दूरसंचार खात्याची 'ट्राय' शी चर्चा सुरू आहे. नवीन दूरसंचार कायदा आणण्याआधी सर्व शंकांचे निरसन केले जाईल, असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याआधीच स्पष्ट केलेले आहे.
नवीन दूरसंचार कायदा कसा असावा, याबाबत सरकारची सर्व हितधारकांसमवेत चर्चा सुरू आहे. दूरसंचार कंपन्यांकडून देखील सरकारने येत्या 30 तारखेपर्यंत लेखी सल्ले मागविले आहेत. सर्व हितधारकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कायद्याचा अंतिम मसुदा जारी केला जाईल.
हेही वाचलंत का ?