नाशिक : पूरग्रस्त शेतकरी महिलेची आत्महत्या | पुढारी

नाशिक : पूरग्रस्त शेतकरी महिलेची आत्महत्या

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या प्रचंड पावसामुळे उभ्या पिकांचे डोळ्यासमोर झालेले नुकसान पाहून सहन न झाल्याने एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. न्यायडोंगरी येथील शेतकरी मंदाबाइ भाऊसाहेब काकळीज (वय ४७) या शेतकरी महिलेने शेतातच विष पिऊन आत्महत्या केल्याने न्यायडोंगरी सह परिसरात खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब काकळीज यांची न्यायडोंगरी महसुली शिवारात नांदगाव रोड लगत कोल्ली नाल्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे. त्यात कांदा, कपाशी, मक्का ही पिके अत्यंत जोमदार आली होती. परंतु गेल्या तीन चार दिवसात सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसामुळे परिसरातील सर्वच नदी नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात काकळीज यांची शेती नाल्याचे दोन्ही बाजूंनी असल्याने त्यांचे ऐन बहरात आलेले कांदा, मक्का, कपाशी ही नगदी पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत.

त्याचबरोबर शेतातील माती ही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे साधनच हिरावल्याची भावना विवश झालेल्या मंदाबाई हिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. शेतातील राहत्या घरीच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंदाबाई यांना दोन मुले एक मुलगी पती सासू सुना नातवंडे असा परिवार आहे. नांदगांव पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

हेही वाचलत का :

मुंबईचा प्रसिद्ध खातू कारखाना यावर्षी सुना सुना

 

Back to top button