नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले, पहिल्याच दिवशी ‘इतकी’ वसुली | पुढारी

नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले, पहिल्याच दिवशी 'इतकी' वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थकीत घरपट्टीचा वाढता डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.17) पासून महापालिकेने 1,258 इतक्या महाथकबाकीदारांच्या घर तसेच दुकानांसमोर ढोल वाजविण्यास सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 73 लाख 57 हजार 856 रुपयांची वसुली झाली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.17)पासून एक लाखाच्या पुढे असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच दुकानांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. पूर्व विभागात सर्वाधिक 28 लाखांची वसुली झाली. त्यानंतर नाशिक पश्चिम विभागात 25 लाख 50 हजारांची वसुली झाली आहे. सर्वांत कमी वसुली पंचवटी विभागात तीन लाख 48 हजार 727 रुपये झाली आहे. सहा विभागांचे विभागीय अधिकारी आणि कर विभागातील कर्मचार्‍यांनी मोहिमेत सहभाग घेतला. सहा विभाग मिळून एकूण 73 ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.

विभागनिहाय करवसुली

नाशिक पूर्व- 28 लाख
नाशिक पश्चिम -25 लाख 50 हजार
पंचवटी विभाग- तीन लाख -48 हजार 727
नाशिकरोड- पाच लाख 89 हजार 129
सिडको विभाग- पाच लाख 20 हजार
सातपूर विभाग- पाच लाख 50 हजार

इतक्या ठिकाणी वाजले ढोल

नाशिक पश्चिम 15
नाशिक पूर्व 23
सिडको 09
पंचवटी 06
नाशिकरोड 08
सातपूर 12

कर भरून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.
– अर्चना तांबे,
अतिरिक्त आयुक्त, मनपा

हेही वाचा :

Back to top button