

न्यूयॉर्क : सध्या पृथ्वीच्या वातावरणात जे अनेक वायू आहेत त्यामध्ये 'प्राणवायू' अशा सार्थ नावाने ओळखल्या जाणार्या ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के आहे. मात्र, ही स्थिती नेहमीच अशी होती असे नाही. सुमारे 45 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानव जिवंत राहू शकेल इतका ऑक्सिजन नव्हता. याबाबत आता नव्याने संशोधन करण्यात आले आहे.
सध्याच्या धारणेनुसार पृथ्वीवरील ऑक्सिजनचा स्तर तीन व्यापक टप्प्यांमध्ये वाढला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याला 'महान ऑक्सिकरण घटना' म्हटले जाते. ही घटना सुमारे 2.4 अब्ज वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे पृथ्वीचे रूपांतर एका अशा ग्रहामध्ये झाले जिथे वातावरण आणि महासागरांमध्ये ऑक्सिजनचा स्तर एक स्थायी विशेषता बनून गेला. त्यापूर्वी पृथ्वी एक असा ग्रह होता जो अनिवार्य रूपाने वातावरण आणि महासागरांमध्ये ऑक्सिजनरहित होता.
ऑक्सिजनच्या स्तराबाबतची दुसरी घटना समजून घेण्यापूर्वी तिसरी घटना आधी समजून घ्यावी लागेल. ही तिसरी घटना सुमारे 42 कोटी वर्षांपूर्वी घडली होती आणि तिला 'पॅलियोजोइक ऑक्सिजनेशन इव्हेंट' असे म्हटले जाते. त्यामध्ये वातावरणातील ऑक्सिजनचा स्तर सध्याइतका वाढला.
पहिल्या आणि तिसर्या घटनेच्या किंवा टप्प्याच्या दरम्यान सुमारे 80 कोटी वर्षांपूर्वी ऑक्सिजनच्या स्तरात व्यापक बदल घडवून आणणारी दुसरी घटना घडली होती. तिला 'नियोप्रोटेरोजोइक ऑक्सिजनेशन इव्हेंट' असे म्हटले जाते. समुद्रतळाशी असलेल्या प्रारंभिक काळातील खडकांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की या काळात ऑक्सिजन आधुनिक स्तराइतका वाढला होता. ही घटना पृथ्वीवर प्राण्यांच्या अस्तित्वाची पुष्टी करणार्या घटनेपेक्षा सुमारे 60 कोटी वर्षे आधी घडली होती.
या काळातील ऑक्सिजनचा स्तर समजून घेण्यासाठी आता संशोधकांनी एक कॉम्प्युटर मॉडेल विकसित केले आहे. त्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रक्रियांबाबतची माहिती आहे ज्या वातावरणात ऑक्सिजनचा स्तर वाढू शकतात किंवा कमी करू शकतात. या मॉडेलवरून असे दिसून आले की 75 कोटी वर्षांपूर्वी वातावरणातील ऑक्सिजनचा स्तर 12 टक्के होता व केवळ काही लाख वर्षांमध्येच तो 0.3 टक्क्यांवर आला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये वृद्धी दिसून आली. सुमारे 45 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वनस्पतींच्या उत्पत्तीपूर्वी ऑक्सिजनच्या स्तरात चढ-उतार दिसून आले.