अजून दोन विधानसभा लढविणार अन् जिंकणार : आमदार हसन मुश्रीफ | पुढारी

अजून दोन विधानसभा लढविणार अन् जिंकणार : आमदार हसन मुश्रीफ

कागल, पुढारी वृत्तसेवा : कुणी कितीही टूरटूर करून उड्या मारू देत, अजून दोन विधानसभा निवडणूक लढविणार आणि जिंकणार असून केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.

येथील देसाई व श्याम कॉलनीत एक कोटी 55 लाख रुपये खर्चाच्या विकासकामाचे उद्घाटन, घंटागाड्या व फायर बुलेटच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने होते.

आ. मुश्रीफ म्हणाले, कागल शहर व तालुक्याचा अजेंडा तयार करून विकासकामे केली. गोरगरिबांच्या जीवनात आमूलाग्रह बदल करण्याचे काम केले. सातशे मंदिरे बांधली. सर्वधर्मीयांना समाधान वाटेल, असे काम केले. कागल शहरासाठी 95 कोटी निधी आणला. शहरातील सर्व विकासकामे पूर्ण केली. त्यामुळे येत्या दोन विधानसभा निवडणुका लढवून जिंकणार आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तर 70 ते 75 हजार मताचे रेकॉर्ड ब—ेक केले जाईल. आपण खासदार होणारच आहे आणि केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. माजी आमदार संजय घाटगे आमच्याबरोबर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या 35 ते 40 वर्षांच्या काळात अनेक सत्ता मिळवल्या. शाहू साखर कारखाना आणि हमीदवाडा साखर कारखान्यात राहता आले नाही म्हणून बदलत्या काळात आपण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना सुरू केला. जिल्हा बँकेवर प्रशासक असताना 134 कोटींचा तोटा असताना बँकेला दोन वर्षांत तोटा भरून काढून 180 कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला. गोकुळ दूध संघामध्ये देखील आमदार सतेज पाटील आणि आपण सत्ता मिळवली. गोकुळ, महानगरपालिका, बाजार समिती या सर्व सत्तेमध्ये येण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. आता कोणीही कितीही उड्या मारल्या तरी देखील आणखीन दोन विधानसभेच्या निवडणुका लढणार आणि जिंकणार देखील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर प्रवीण काळबर, सौरभ पाटील यांची भाषणे झाली. स्वागत के. एस. पाटील यांनी केले तर आभार बबलू पाटील यांनी मानले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नितीन दिंडे, तात्या पाटील, पी. बी. घाडगे, अजित कांबळे, संजय ठाणेकर आदी उपस्थित होते.

Back to top button