नाशिक : त्र्यंबकला भाविकांच्या सेवेत स्वयंचलित ई-टॉयलेट | पुढारी

नाशिक : त्र्यंबकला भाविकांच्या सेवेत स्वयंचलित ई-टॉयलेट

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक-इको-टॉयलेट कार्यान्वित झाले आहे. अशा प्रकारची सुविधा आतापर्यंत केवळ उटी, कुलू, मनाली अशा पर्यटनस्थळांवर उभारण्यात आलेली आहे.

देश-विदेशातून त्र्यंबकराजाच्या दरबारी भाविक येतात त्यांना येथे आल्यानंतर सुखदायी वाटावे म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्राधान्याने काम करत आहे. नुकतेच येथे स्वयंचलित ई-टॉयलेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील टॉयलेट आणि युरिनल यांचे प्रत्येकी चार युनिट सेवेत रुजू झाले आहेत. त्यामध्ये आणखी 22 युनिटची भर पडणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सर्वाधिक समस्या असते ती स्वच्छतेची. नवीन इको टॉयलेटमध्ये स्वयंचलित फ्लश यंत्रणा आहे. दरवाजा उघडल्यानंतर स्वयंचलित फ्लश यंत्रणा सुरू होते. मखमलाबाद येथील आर्या टेक्नालॉजी या कंपनीने या इलेक्ट्रॉनिक-इको-टॉयलेटची उभारणी केली. इलेक्ट्रॉनिक-इको-टॉयलेटमधून व्यक्ती बाहेर आल्यानंतर संपूर्ण युनिट आतून आपोआप धुतले व स्वच्छ केले जाते. पाण्याच्या टाकीची पातळी स्वयंचलित पद्धतीने राखली जाते. भाविक बाहेर आल्यानंतर पाय धुण्यासाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर चालणारे नळ आहेत. लहान मुलांचे डायपर नष्ट करण्यासाठीसुद्धा स्वतंत्र यंत्रणा आहे. सांडपाणी व मैला यांचे विघटन करणारा अद्ययावत प्लॅन्ट येथे बसविण्यात आला आहे. दर्शन रांगेतून आवश्यकता भासल्यास येथे आलेला भाविक अनवाणी पावलांनी आल्यास त्यांच्यासाठी येथे चप्पलदेखील उपलब्ध असेल. विशेष म्हणजे यासाठी लागणारे सर्व पाणी हे जलशुद्धीकरण यंत्रातून बाहेर आलेले टाकाऊ पाणी आहे. पाण्याची बचत करणारी आणि बॅटरी बॅकअपवर चालणारी यंत्रणा आता भाविकांना अधिक सुखदायी अनुभव देणारी आहे.

अद्ययावत सुविधांवर भर :

दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून न्या. विकास कुलकर्णी यांनी सेवासुविधा निर्माण करताना त्यात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेत अद्ययावत सुविधांचा पाठपुरावा केला आहे. जुलैत पूर्व दरवाजा दर्शनबारी मंडपाचे बहुतांश काम पूर्ण झाले आणि भाविकांना अद्ययावत अशा सुविधांचे दर्शन घडले. सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या दर्शनबारीस साजेशा मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यांना विश्वस्त तृप्ती धारणे, ॲड. पंकज भुतडा, संतोष कदम, दिलीप तुंगार, प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल आणि सचिव मुख्याधिकारी संजय जाधव यांचे सहकार्य मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button