राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप | पुढारी

राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 10) जिल्हा परिषदेतर्फे जंतनाशक गोळ्यांचे वाटप होत आहे. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटाच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 लाख 85 हजार 554 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, प्रकल्प अधिकारी महिला बाल विकास दीपक चाटे तसेच शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 592 उपकेंद्रे, 5,096 अंगणवाड्या, 3,790 शाळांमध्ये सोमवारी या जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आशा वर्कर्स घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करणार आहेत. आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे, त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे तीव्र प्रमाणात कृमीदोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात तसेच त्यांना लवकर थकवा येतो. परिणामी त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. या सर्व बाबींवर इलाज म्हणून जंतनाशक गोळी आवश्यक आहे. शाळा व अंगणवाडीतून दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पालकांनी आपल्या पाल्यांना द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button