Dussehra 2022 : खरेदीचा आज महामहोत्सव | पुढारी

Dussehra 2022 : खरेदीचा आज महामहोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि. 5) बाजारात खरेदीचा महामहोत्सव बघावयास मिळणार आहे. सराफ बाजारासह वाहन बाजार, रिअल इस्टेट, होम अप्लायन्सेस, कापड बाजार तसेच फूल बाजारात सध्या तेजीचे वारे असून, दसर्‍याच्या दिवशी यात मोठी भर पडणार आहे. विशेषत: सराफ बाजारात मोठी उलाढाल अपेक्षित असून, सोन्या-चांदीच्या घटलेल्या किमती लक्षात घेऊन नाशिककर दसर्‍याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदी खरेदी करतील, असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविला जात आहे.

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांनंतर हा मांगल्याचा सण असलेला दसरा निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. नाशिकची बाजारपेठ बर्‍यापैकी शेतकर्‍यांवर अवलंबून असल्याने, जिल्ह्यात पाऊसपाणी समाधानकारक झाल्यास दिवाळी-दसरा या सणांना ‘अर्थ’ प्राप्त होतो. यंदा या सर्वच बाबी जुळून आल्याने, यंदाचा दसरा हा मोठ्या उलाढालीचा ठरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून व्यापारी वर्गांनीदेखील ऑफर्सचा पाऊस पाडल्याने, ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. दरम्यान, गुढीपाडव्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्र काहीसे मंदावले असल्याने, दसरा हा सण या क्षेत्राला उभारी देणार आहे. सध्या नाशिकच्या चहूबाजूने परवडणार्‍या घरांसह मोठमोठ्या लक्झरी फ्लॅटचे प्रोजेक्ट सुरू असल्याने नाशिककरांना प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे दसर्‍याच्या दिवशी अनेकांनी गृहप्रवेशाचे नियोजन केले आहे.

त्याचबरोबर दसर्‍याला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे सराफ बाजार सज्ज झाला आहे. सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन व्यावसायिकांनी नियोजन केले आहे. वाहन बाजारातही मोठी रौनक असून, दसर्‍याला डिलिव्हरी देण्यासाठी शोरूमचालक सज्ज झाले आहेत. होम अप्लायन्सेसमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठी खरेदी केली जाणार आहे. मोबाइल मार्केटही तेजीत असून, कर्जासाठी फायनान्स कंपन्यांचे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकूणच दसर्‍याच्या दिवशी मोठी उलाढाल अपेक्षित असल्याने व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

फुलबाजारात झुंबड उडणार 

पावसामुळे फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहे. अशातही बाजारात तेजी असून, झेंडूच्या फुलांनी मोठी मागणी दिसून येत आहे. दसर्‍याच्या दिवशी घरोघरी झेंडूच्या फुलांचे तोरण तसेच वाहनांना फुलमाळा लावण्याची परंपरा असल्याने फूल खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडणार आहे. अशात फुलबाजाराचा सुगंध सर्वत्र दरवळणार असल्याचे दिसून येत आहे.

1800 रुपयांनी सोने स्वस्त 

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानले जात असून, सोन्याचे दर गेल्या दीड महिन्यात प्रतितोळ्यामागे (10 ग्रॅम) तब्बल 1800 रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांसाठी खरेदीचा उत्तम योग जुळून आला आहे. मंगळवारी सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम जीएसटीसह 48 हजार 900 रुपये इतका नोंदविला गेला, तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅमसाठी जीएसटीसह 52 हजार 800 रुपये इतका नोंदविला गेला. गेल्या काही वर्षांत हा दर बर्‍यापैकी कमी असल्याने, नाशिककर सोने खरेदीचा योग साधतील.

गृहकर्ज महागल्याचा परिणाम नाही

30 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने कर्ज आणि त्याचे हप्ते दोन्ही महागले आहेत. मात्र याचा गृहखरेदीवर याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कारण शहराच्या चहूबाजूने उपलब्ध असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये बुकिंगचा मोठा सपाटा सुरू असून, बांधकाम व्यावसायिकांना दसर्‍याच्या मुहूर्तावर ग्राहकांना पझेशन देण्याचे आव्हान असणार आहे. अनेक प्रकल्प पूर्णपणे तयार असल्याने, ग्राहकांना बुकिंग अन् गृहप्रवेश दोन्हीही सोबत करता येणार आहे.गेल्या काही दिवसांपासून दुचाकी आणि चारचाकी बुकिंगचा धडाका सुरू असून, दसर्‍याच्या दिवशीही तो कायम असणार आहे.

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीमध्ये रेकॉर्डब—ेक उलाढाल होण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव कमी झालेच, शिवाय ग्राहकांचीही मागणी वाढली आहे. गुंतवणूक कशात करावी, याची लोकांना जाण झाल्याने सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. पितृपक्षात तसेच नवरात्रात सोन्याची चांगली उलाढाल झाली. तसेच पुढच्या काळात लग्नसराई असल्याने, मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाण्याची शक्यता आहे.
-मयूर शहाणे, संचालक,
मयूर अलंकार.

रुंगटा ग्रुपच्या ‘अबतक 0’ या ऑफर्सला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. नवरात्रोत्सव काळात चांगले बुकिंग झाले. नागरिकांचा गृह खरेदीकडे चांगला कल असल्याने दसर्‍यानिमित्तही मोठ्या प्रमाणात गृहखरेदीचे स्वप्न साकार केले जाईल. बुकिंग आणि पझेशन दोन्ही बाबतीत प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत.
– निखिल रुंगटा,
रुंगटा ग्रुप.

दसर्‍याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातच यंदा कोविडविरहित दसरा साजरा केला जात असल्याने, वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना एक्सयूव्हीव्यतिरिक्त इतर कार लगेचच उपलब्ध होत असल्याने, त्या खरेदीकडे चांगला कल दिसून येत आहे. मात्र, एक्सयूव्ही घ्यायची आहे, त्यांना वेटिंगचा सामना करावा लागत आहे. पण, अशातही बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे.
– राजेश कमोद, महाव्यवस्थापक,
सेवा ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स.

रिअल इस्टेट क्षेत्रात खूपच चांगली परिस्थिती आहे. नवरात्रोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दसर्‍याच्या दिवशीदेखील चांगले चित्र दिसून येईल. बुकिंग आणि पझेशन दोन्ही बाबतीत प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने बांधकामांना गती आली आहे. एकूणच दसर्‍याच्या दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभणार आहे.
– सुनील गवादे,
सचिव, नरेडको

हेही वाचा :

Back to top button