सेतू बांधा रे सागरी... | पुढारी

सेतू बांधा रे सागरी...

आज देश-विदेशात ‘विजयादशमी’चा सण उत्साहात साजरा होत आहे. भगवान श्रीरामांनी आसुरी, आततायी व अहंकारी प्रवृत्तीच्या रावणावर आजच्याच दिवशी विजय मिळवून त्याचा वध केला. हा सत्याचा असत्यावरील व ज्ञानाचा अज्ञानावरील विजयही मानला जातो. मुंडक उपनिषदात ‘सत्यमेव जयति नानृतं’ असे म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘नेहमी सत्याचा किंवा सत्यवानाचाच विजय होतो, असत्याचा किंवा असत्यवानाचा नाही’. विजयादशमी किंवा दसरा हे त्याचेच एक प्रतीक आहे. रावणावर विजय मिळवण्यासाठी भगवान श्रीराम, लक्ष्मण व वानरसेना समुद्रावर पूल बांधून लंकेत गेली असे वर्णन रामायण व अन्य प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटापासून ते श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत हा सुमारे 48 किलोमीटर लांबीचा पूल आहे. या पुलाची ही माहिती…

* वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडातील 22 व्या सर्गात रामसेतू बनवण्याचे वर्णन 36 श्लोकांमधून विस्ताराने करण्यात आले आहे. देवतांचा स्थापत्यविशारद विश्वकर्मा यांचा पुत्र असलेला नल वानर स्वतःही स्थापत्यकलेत निष्णात होता. त्याने समुद्रावर कमी वेळेत मजबूत व सुरक्षित पूल बांधण्याची जबाबदारी घेतली.

* ताड, नारळ, काथ्या, आंबा, अशोक आणि लिंबाची झाडे तोडून वानरांनी समुद्रात टाकली. महाबलवान वानर मोठे मोठे दगड उचलून व ते गाडीवर टाकून किनार्‍यावर आणू लागले.

* काही वानर शंभर योजन लांब दोरी पकडून पूल सरळ करीत होते. काही काठ्या घेऊन उभे होते जेणेकरून काम वेगात व्हावे.

* पहिल्या दिवशी चौदा योजन, दुसर्‍या दिवशी 20 योजन, तिसर्‍या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन आणि पाचव्या दिवशी 23 योजन असा एकूण शंभर योजन लांबीचा पूल उभा करण्यात आला.

नल आणि वानरसेनेने पाच दिवसांतच शंभर योजन पूल बांधून सर्व सैन्य लंकेच्या सुवेल पर्वतापर्यंत पोहोचले.

* स्त्रियांच्या डोक्यावर जसा भांग असतो तसा हा पूल समुद्रात दिसत होता, त्याची शोभा आकाशातील छायापथासारखी दिसत होती, असे वर्णन आहे.

* तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’च्या लंकाकांडात लिहिले आहे की ‘अति उतंग गिरि पादप लीलहिं लेहिं उठाइ। आनि देहिं नल नीलहि रचहिं ते सेतु बनाइ॥’ याचा अर्थ वानर आणि अस्वले उंच-उंच पर्वत व झाडे उचलून आणायचे आणि नल-नील यांना देत. त्यांच्या सहाय्याने त्यांनी सुंदर सेतू बनवला.

* स्कंद पुराणाच्या सेतू महात्म्यात धनुष्कोडी तीर्थाचा उल्लेख आहे. त्यामध्ये म्हटले आहे की दक्षिणेत समुद्र तीरावर तिथे रामसेतू आहे, तिथे धनुष्कोडी नावाचे तीर्थ आहे.

* नेदरलँडमध्ये सन 1747 मध्ये मलाबार बोपन मॅपमध्ये रामसेतू दर्शवला आहे. याची एक आवृत्ती आजही तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात आहे.

* बि—टिश तज्ज्ञ सी.डी. मॅकमिलन यांनी सन 1903 मध्ये सांगितले की पंधराव्या शतकापर्यंत भारत व श्रीलंकेचे लोक रामसेतूवरून पायी ये-जा करीत असत.

* सन 1480 मध्ये चक्रीवादळामुळे या पुलाचा काही भाग तुटला आणि पाण्यात बुडाला. तो आजही पाण्यात 3 ते 30 फूट खोलीवर पाहायला मिळू शकतो.

* या पुलावर अनेक ठिकाणी पाण्यावर तरंगणारे दगड म्हणजेच ‘फ्लोटिंग रॉक्स’ही आढळले आहेत. हे कोरल रीफ्स म्हणजेच प्रवाळ किंवा समुद्रातील कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले दगड आहेत. सागरी जीव व वनस्पतींच्या अवशेषांमधून ते बनतात. कार्बन डेटिंगने समजते की हे कोरल रीफ्स सुमारे 7300 वर्षे जुने आहेत.

* ‘सायन्स चॅनेल’ने अमेरिकेतील काही संशोधकांची या पुलाबाबत मुलाखत घेतली होती. या संशोधकांच्या मते, हा पूल नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित आहे.

Back to top button