पाच लाख वर्षांपूर्वीच्या हत्तीचा दात | पुढारी

पाच लाख वर्षांपूर्वीच्या हत्तीचा दात

तेल अवीव : पुरातत्त्व संशोधकांनी इस्रायलमध्ये प्रागैतिहासिक काळातील एका हत्तीचा भला मोठा दात शोधून काढला आहे. या हत्तीची तत्कालीन लोकांनी शिकार केली होती. दक्षिण इस्रायलमधील रीटन येथे हा हस्तिदंत सापडला असून तो पाच लाख वर्षांपूर्वीचा आहे. हा दात तब्बल आठ फूट लांबीचा आहे.

प्रागैतिहासिक काळातील हत्तींविषयी अध्ययन करीत असलेल्या ईटन मोर या जैववैज्ञानिकाने हा दात शोधला आहे. हा दातच इतका मोठा आहे की त्यावरूनच संबंधित हत्ती किती मोठ्या आकाराचा असेल याची कल्पना येऊ शकते. सध्याच्या काळात आफ्रिकन हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. त्याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या आकाराचा हा हत्ती होता. त्याचा दात एकदम सरळ आहे हे विशेष.

चार लाख वर्षांपूर्वी हे हत्ती नामशेष होण्यापूर्वी ते युरोप व मध्य पूर्वेत अन्य सस्तन प्राण्यांसमवेत वावरत होते. ईटन यांनी सांगितले की मी हा दात थोडासा जमिनीबाहेर आलेला पाहिला होता. एखाद्या मोठ्या प्राण्याच्या हाडासारखा तो दिसत होता. मी तो जवळून पाहिल्यावर लक्षात आले की हे काही तरी वेगळे आहे आणि त्याची अन्य वैज्ञानिकांना माहिती दिली. हा पूर्ण स्थितीत असलेला व पाच लाख वर्षांपूर्वीच्या हत्तीचा दात सापडल्याने आम्ही आनंदित आहोत.

Back to top button