नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री | पुढारी

नवरात्रोत्सव : परतीच्या पावसाने झेंडूचा उडाला रंग, किलोसाठी १०० ते १२० रुपयांची विक्री

नाशिक, चांदवड : सुनील थोरे
शारदीय नवरात्रोत्सव काळात झेंडूच्या फुलांना सगळीकडे मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतो. तालुक्यात फुलांचे शेत बहारदारपणे फुलले असल्याने दोन पैसे चांगले मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जोरदारपणे बरसणाऱ्या परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे पूर्णतः नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे. दरम्यान, नुकसानीमुळे शहरातील बाजारात फुलांच्या किमती किलोमागे १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सध्याचे चित्र आहे.

शारदीय नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी या सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलांना नागरिकांची मोठी मागणी असते. यामुळे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध रंगीबेरंगी झेंडूच्या फुलांची लागवड करीत असतो. यात प्रामुख्याने अष्टगंधा, यूएस, पितांबरी, शेंद्री, उत्सव, येलो ब्यूटी अशा विविध आकर्षक प्रकारच्या प्रजातींच्या फुलांची लागवड केली जाते. तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रफळावर शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली आहे. नवरात्रोत्सव सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर शहरातील व्यापारी फुले खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. जागेवर किलो मागे शेतकऱ्याला ६० ते ७० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीसाठीचा खर्च व वेळ दोन्ही वाचत आहे. मात्र, हेच फुले शहरातील बाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांना ४० ते ५० रुपयांचा नफा मिळत आहे. येत्या दसऱ्याला फुलांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्पादन खर्चही सुटेना!
गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे तोडणीस आलेल्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने फुले जागीच काळवटून जात असल्याने शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागत आहे. तसेच यंदा सतत पावसाळा असल्याने फुलांवर मोठ्या प्रमाणात आळी पडली आहे. या आळीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणी करावी लागली आहे. या नुकसानीमुळे फुलांच्या लागवडीचा खर्चदेखील वसूल होतो की नाही, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

दरवर्षी शेतात झेंडूच्या फुलांची दोन एकरांवर लागवड करतो. यंदादेखील अष्टगंध प्रजातींच्या फुलांची लागवड केली आहे. फुले चांगली आली असल्याने दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, दोन दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे संपूर्ण फुलांचे नुकसान झाले आहे. यामुळे लागवडीसाठी आलेला खर्चदेखील वसूल होतो की नाही यांची चिंता आहे.
– शरद भवर, शेतकरी, गुऱ्हाळे

एकरी फुले लावण्यासाठी येणारा खर्च –
रोप – १५ हजार

मजुरी – ५००० हजार
औषधे – ७०००

खते – ६ हजार

हेही वाचा :

Back to top button