संशोधनासाठी मंगळाबरोबरच आता शुक्रालाही अधिक प्राधान्य | पुढारी

संशोधनासाठी मंगळाबरोबरच आता शुक्रालाही अधिक प्राधान्य

वॉशिंग्टन : मंगळावर मानवी मोहीम पाठवण्याच्या तयारीबरोबरच तेथे मानवी वस्ती स्थापन करण्याच्या कल्पनेवरही विचार होत आहे. असे असतानाच शास्त्रज्ञांनी ‘शुक्र’ या ग्रहाचाही अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. यामुळेच नासा, युरोपिय आणि अन्य अंतराळ संस्थांनी शुक्रावर आपले यान पाठवण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरुवातही झाली आहे.

उल्लेखनीय म्हणजे शुक्रावर नरकासारखी भयंकर स्थिती आहे. तरीही शास्त्रज्ञांच्या मते मंगळावर मानवी मोहीम आयोजित करण्यापूर्वी शुक्राचाही अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहेे. तसे पाहिल्यास आपल्या सूर्यमालेतील अन्य ग्रहांच्या तुलनेत शुक्रावरची स्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. येथील तापमान तब्बल 475 अंश सेल्सिअस इतके प्रचंड आहे. याशिवाय पृथ्वीच्या वातावरणीय दाबाच्या तुलनेत शुक्रावरील वायूचा दाब 90 पट जास्त आहे. यामुळे तेथील तापमान आणि हवेचा दाब मानव सहन करूच शकत नाही. याशिवाय तेथे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे ढग आहेत. तसेच शुक्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या एक वर्षापेक्षाही मोठा असतो.

सर्वकाही प्रतिकूल असतानाही शुक्र हा खगोल शास्त्रज्ञांसाठी पहिली पसंद आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वी आणि शुक्राची स्थिती एकसारखीच होती. मात्र, त्यानंतर स्थिती बदलत गेली आणि पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले. तर शुक्राची स्थिती नरकासारखी बनली. तरीही मंगळाच्या तुलनेत शुक्र हा ग्रह अगदी जवळ आहे. याशिवाय मंगळावर पोहोचण्यास तीन वर्षे तर शुक्रावर पोहोचण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. अशा कारणांमुळे खगोल शास्त्रज्ञ संशोधानासाठी शुक्राला पसंती देत आहेत. तर मंगळावरील तापमान फारच कमी असते. तेथे सरासरी उणे 18 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. याशिवाय तेथे सातत्याने धुळीची वादळे येत असतात. तसेच मंगळावर 95 टक्के कार्बनडायॉक्साईड आणि एक टक्क्याहून कमी ऑक्सिजन आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असल्यानेच शास्त्रज्ञ मंगळाबरोबरच शुक्राचाही अभ्यास करण्यास प्राधान्य देत आहेत.

Back to top button