मुदतीत अर्ज न भरल्याने होणार्‍या नुकसानीस महाविद्यालयालाही जबाबदार धरणार : देवढे | पुढारी

मुदतीत अर्ज न भरल्याने होणार्‍या नुकसानीस महाविद्यालयालाही जबाबदार धरणार : देवढे

नगर : पुढारी वृत्तसेवा : सन 2022-23 वर्षातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन व नूतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावेत. मुदतीत अर्ज न भरल्याने होणार्‍या नुकसानीस विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित महाविद्यालय देखील जबाबदारी राहील, असा इशारा समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग यांच्यामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरिता सन 2022-23 मध्ये नवीन व नूतनीकरण अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलमार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रमास प्रवेश, विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना दिली जाते. वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज दि.22. सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यासाठी नवीन अर्ज दि. 22 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यासाठी नवीन अर्ज दि. 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2022 असे वेळापत्रक आहे. सर्व महाविद्यालयांनी वेळापत्रका प्रमाणे अर्ज भरून घ्यावेत. अर्जाची पडताळणी करावी व पात्र अर्ज जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत, असे आवाहन देवढे यांनी केले आहे.

Back to top button