नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग | पुढारी

नवरात्रोत्सव : घरोघरी घटस्थापनेची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिशक्ती, आदिमायेच्या नवरात्रोत्सवास सोमवारी (दि.२६) प्रारंभ होत आहे. उत्सवासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. नाशिककरांनी वीकेंडचा मुहूर्त साधत घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी केली.

यंदाच्या वर्षी गणेशोेत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. स्त्रीशक्तीचा जागर असलेल्या या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी केली जात आहे. घरोघरी पुढील नऊ दिवस घट बसणार असून, त्यासाठीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी (दि.२४) बाजारात गर्दी केली. त्यामुळे शहराचा मुख्य परिसर असलेल्या रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, रेडक्राॅस भाग गर्दीने फुलून गेला. तर उपनगरांमध्येही खरेदीचा जोर होता. घटस्थापनेसाठी देवीचा मातीचा मुखवटा, माती, टोपली, सुगड तसेच अन्य पूजा साहित्याची खरेदी केली. तसेच घटाभोवती सजावटीचे साहित्य घेण्यासाठी लगबग पाहायला मिळाली.  पितृपक्षामुळे गेल्या १५ दिवसांपासून बाजारात मरगळ आली आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवानिमित्ताने पुन्हा नाशिककर खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने बाजारात चैतन्य पसरले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचे विघ्न दूर सरल्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रही सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल.

मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात

शहर-परिसरातील देवीमंदिरांमध्ये नवरात्राेत्सवाची तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. तसेच विविध सार्वजनिक मित्रमंडळांतर्फे देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यासाठी मंडळांकडून जय्यत तयारी केली गेली असून, ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

हेही वाचा:

Back to top button